मृत्यूचे नेमके कारण गुलदस्त्यात
| महाड | प्रतिनिधी |
महाड एमआयडीसीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये सोमवारी(दि.16) सायंकाळच्या सुमारास एक कामगार इलेक्ट्रीशनचे काम करीत असताना अचानक शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे नेमके कारण समोर न आल्याने एमआयडीसी परिसरासह महाडमध्ये शंकाकुशंकाना वाव मिळत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, महाड एमआयडीसीत गेली अनेक वर्षे प्लॉट क्रमांक 21, 22 वर पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी कार्यरत आहे. सोमवारी सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास आलम हरुन खान (25) हा कामगार पिडिलाइट कंपनीत इलेक्ट्रीशनचे काम करीत होता. तो काम करीत असताना त्याला अचानक विजेचा जोरदार झटका बसला आणि तो जागीच कोसळला. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या अन्य कामगारांची धावपळ उडाली. लगेच आलम खान याला उपचाराकरीता महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेचे नेमके कारण अस्पष्ट असून संबंधित ठेकेदाराचे नाव देखील अस्पष्ट आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एमआयडीसी परिसरतील कंपनीमधील कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पुढील तपास महाड एमआयडीसीचे पोलीस अधिकारी जीवन माने हे करीत आहेत.







