एल ॲन्ड कंपनीमधील कामगारांच्या प्रश्नांवरून वाद
| रायगड | जिल्हा प्रतिधी |
जिल्ह्यात शिंदे गटातील आमदार महेंद्र थोरवे आणि खालापूर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांच्यामध्ये श्रेयवाद पेटला आहे. “एल ॲन्ड टी कंपनीत जायाचे नाही, अन्यथा ठार मारू,” अशी धमकी आमदार थोरवे यांनी दिल्याचा आरोप बैलमारे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय कलह आता टोकाला पोहचू लागले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खालापूर तालुक्यातील सावरोलीमध्ये गेल्या वर्षभरापासून एल ॲन्ड टी कंपनी काम करीत आहे. साधारणतः 35 एकर क्षेत्रामध्ये वसलेल्या या कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार व व्यवसाय मिळावा, म्हणून खालापूरचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य, राष्ट्रवागदीचे गट नेते संतोष बैलमारे यांनी कंपनीत पत्रव्यवहार केला होता. मात्र, कंपनीने दखल घेतली नाही. त्यामूळे बैलमारे यांनी 3 सप्टेंबरला उपोषण करणार, असा इशारा दिला होता. अखेर पोलीस व महसूल प्रशासनाने मध्यस्थी करीत कंपनी प्रशासनाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये स्थानिकांना 30 सप्टेंबरपर्यंत घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु, त्या आश्वासनाची पुर्तता कंपनीने मुदतीत केली नाही. त्यामुळे 13 ऑक्टोबरला पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला. अखेर महसूल प्रशासनाने परत मध्यस्थी करीत तहसील कार्यालयात 19 ऑक्टोबरला दुपारी बैठक घेतली जाईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, बैलमारे यांना आमदार थोरवे यांनी फोन करून “कंपनी मी आणली आहे, कंपनीत जायाचे नाही. अन्यथा तंगड्या तोडून ठार मारू,” अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या खालापूर येथील एल ॲन्ड टी कंपनीच्या कामगारांच्या प्रश्नावरून आणि श्रेयवादातून संतोष बैलमारे आणि आमदार थोरवे यांच्यामध्ये राजकीय वाद पेटू लागले आहे. त्यामुळे आता बैलमारे काय भुमिका घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
खालापूर तालुक्यातील सावरोली या गावात एल ॲन्ड टी कंपनी आली. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून गावातील तरुणांना रोजगार आणि व्यवसाय उपलब्ध व्हावा, यासाठी कंपनीकडे मागणी केली. अखेर कंपनीने रोजगार देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार, तरुणांना कंपनीत घेण्याचे ठरले. मात्र, आमदार थोरवे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करीत तरुणांचा रोजगार अडविण्याचे काम केले आहे.
संतोष बैलमारे,
जिल्हा परिषद सदस्य
बैलमारे आणि इतर कार्यकर्ते गेल्या दोन दिवसांपासून एल ॲन्ड टी कंपनीचे गेट बंद करण्याची भाषा करीत स्टंटबाजी करत आहेत. मी लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना फोन करून समजावले होते. कामांच्या मुद्द्यावर चर्चा देखील केली. मात्र, त्यांनी माझ्यावर हातपाय तोडण्याची भाषा केल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा जो आरोप केला आहे, तो अत्यंत चुकीचा आणि निराधार आहे. या प्रकरणाची सत्यता समोर यावी म्हणून रायगड जिल्हा पोलीस अधिक्षकांना फोन करून कॉल रेकॉर्डिंग काढून तपासावे, अशी विनंती केली आहे.
आमदार महेंद्र थोरवे







