केवळ दोनच गाड्या सुरू; तिकिटाअभावी पर्यटकांचा हिरमोड
| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये पर्यटनासाठी तसेच खासकरून मिनी ट्रेनच्या सफारीसाठी पर्यटक आपल्या लवाजम्यासह येत असतात. परंतु, नेरळ-माथेरान दरम्यान केवळ दोनच गाड्या सुरू असून एका बोगीत तीस आसनव्यवस्था असते. त्यामुळे ऐन सुट्टीच्या हंगामात तिकिटाअभावी खासगी वाहनांचा आधार घेऊन पर्यटकांना माथेरान गाठावे लागते. दरवेळी रेल्वे प्रशासनाकडून या मार्गावर खडी टाकणे, स्लीपर्स बदलणे, रेल्वे स्थानकावरील दुरुस्ती त्याचप्रमाणे अन्य कामे सुरू असतात. त्यासाठी आजवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे ठेकेदार मालामाल होत आहेत. परंतु, नेरळ ते माथेरान दरम्यान मिनी ट्रेनच्या फेऱ्या वाढविल्या जात नाहीत.
अमन लॉज ते माथेरान स्टेशन या मार्गावर मिनी ट्रेनची शटल सेवा बाराही महिने सुरू असल्यामुळे पर्यटकांना या दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर या गाडीत बसण्याचा आनंद घेता येत आहे. या शटलला घाट सेक्शन नसताना देखील पुढे मागे दोन इंजिन्स लावण्यात येतात. तर, नेरळहुन येणाऱ्या तीव्र चढावावर फक्त एका इंजिनच्या साहाय्याने पाच बोग्यांची गाडी चालवली जाते. याच शटलमधील प्रत्येकी एक इंजिन नेरळ-माथेरान मार्गासाठी वापरण्यात आल्यास या मार्गावर ट्रेनच्या फेऱ्या वाढू शकतात. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना डोंगर दर्यांच्या सान्निध्यात प्रवास करताना गाडी संपूर्ण डोंगराला वळसा घालून खोल दरीच्या वरून जात असताना एक वेगळीच मजा, आनंद मिळू शकतो. संबंधित अधिकारी वर्गाने याबाबत गांभीर्याने लक्ष केंद्रित करून पर्यटकांना या झुकझुक गाडीचा मनमुराद आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे पर्यटकांमधून बोलले जात आहे.
आम्ही जानेवारी महिन्यात शनिवारी सकाळी नेरळ स्थानकावर आलो असता गाडी फुल्ल झाल्याने आम्हाला तिकीट उपलब्ध झाले नाही. दोनच ट्रेन असल्याने पुढची ट्रेन दोन तासांनी होती. एवढा वेळ मुलांना घेऊन ताटकळत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. निदान चार ट्रेन या मार्गावर सुरू केल्यास सर्वाना या ट्रेनमध्ये बसण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.
– सिद्धांत पाठक, पर्यटक, मुंबई
मिनिट्रेन फेऱ्या
नेरळ ते माथेरान
सकाळी 8.50 आणि 10.25
माथेरान ते नेरळ
दुपारी 2.45 आणि संध्याकाळी 4.00
शटल ट्रेन वेळापत्रक
माथेरान ते अमन लॉज स्टेशन
सकाळी 8.20, 9.10, 10.05 व 11.35
दुपारी 1.10,2.00, 3.15, 5.20
अमन लॉज ते माथेरान स्टेशन
सकाळी 8.45, 9.35, 10.30, 12.00
दुपारी 1.35, 2.25, 3.40, 5.45







