| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायतीतील विविध समित्यांचे सभापतीपद गेल्या दीड महिन्यापासून रिक्त आहे. 10 फेब्रुवारी 2026 रोजी समिती सभापतींचा कार्यकाल संपल्यानंतर आजपर्यंत नवीन सभापतींची निवड झालेली नाही.
महिला व बालकल्याण समिती, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, आरोग्य समिती, बांधकाम समिती अशा अनेक महत्त्वाच्या समित्यांचे सभापती पद रिक्त असल्यामुळे नगरपंचायतीच्या कामकाजावर परिणाम होत आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या समित्या कार्यरत नसल्याने निर्णयप्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत.
गेल्या दीड महिन्यात सभापती निवडीसंदर्भात दोन वेळा बैठक घेण्यात आली; मात्र कोरम पूर्ण न झाल्यामुळे निवड प्रक्रिया पार पडली नाही. परिणामी समित्यांचे सभापती पद रिक्तच राहिले आहे. नगरपंचायतीच्या विविध समित्या ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामकाजातील महत्त्वाची कडी मानली जाते. या समित्यांमार्फत नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित निर्णय घेतले जातात. मात्र सभापती पद रिक्त असल्याने नागरिकांच्या तक्रारी व मागण्यांवर ठोस निर्णय घेण्यात विलंब होत आहे. नगरपंचायतीच्या राजकारणातील गोंधळामुळे नागरिकांना मूलभूत सेवांचा लाभ मिळण्यात अडथळे येत आहेत. नागरिकांनी या पदांची निवड तातडीने करून समित्यांचे कामकाज सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे.






