अपूर्ण कामामुळे प्रवाशी संतप्त; मुगवली ब्रिजपर्यंत वाहनांच्या रांगा
| माणगाव | प्रतिनिधी |
कोकणातून मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या वाहनांच्या प्रचंड वाढलेल्या संख्येमुळे माणगाव परिसरात पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. माणगाव-लोणेरे दरम्यान, विशेषतः माणगाव पासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मुगवली ब्रिजपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने महामार्ग अक्षरशः ठप्प झाला होता.
या कोंडीमुळे कोकण वासीयांसह इतर प्रवासी तासन्तास महामार्गावर अडकून पडले. बायपासचे काम अपूर्ण असल्याने वाहतूक कोंडीचा फटका सर्वांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही साडेसाती कायम आहे. याबाबत स्थानिक नागरिक व कोकणवासीय नागरिकात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
उन्हाच्या तडाख्यात आणि प्रचंड गर्दीत नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. अनेकांना आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यात उशीर झाला, तर काही प्रवाशांना आवश्यक सेवा मिळण्यातही अडचणी आल्या. दरम्यान, खासदार सुनील तटकरे यांनी नुकत्याच माणगाव येथील एका कार्यक्रमात 31 मेपर्यंत माणगाव बायपास मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात बायपासचे काम अद्याप मोठ्या प्रमाणात अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे. बायपास सुरू न झाल्यास माणगाव बाजारपेठेतील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम राहणार, हे स्पष्ट होत आहे. सोमवारी मुंबईकडे परतीच्या प्रवासाला निघालेल्या कोकण वासीयांची मोठी गर्दी झाल्याने दिवसभर कोंडीची तीव्रता वाढतच गेली.
माणगाव बाजारपेठ आणि महामार्गावरील वाहतूक कोंडी आता नित्याची समस्या बनली असून, स्थानिक नागरिक आणि प्रवासी या समस्येमुळे अक्षरशः वैतागले आहेत. वारंवार दिली जाणारी आश्वासने आणि प्रत्यक्षात होणारा विलंब यामुळे प्रशासनावरील विश्वासही ढासळताना दिसत आहे. माणगाव बायपासचे काम तातडीने पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, तसेच पर्यायी वाहतूक नियोजन करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी आता सर्व स्तरातून होत आहे.
पोलिसांची दमछाक
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक शाखा व माणगाव पोलीस यांनी संयुक्तपणे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मात्र, वाहनांची प्रचंड संख्या आणि अरुंद रस्त्यांमुळे कोंडी सोडवताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.







