| अलिबाग | प्रतिनिधी |
‘नशामुक्त भारत अभियान’ हे केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत दि.15 ऑगस्ट 2020 रोजी सुरू करण्यात आलेले महत्त्वाचे राष्ट्रीय अभियान आहे. यंदा या अभियानाचे सहावे वर्ष साजरे होत असून, मंगळवारी (दि.18) रायगड जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नशामुक्तीची शपथ घेतली.
गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तरुणांच्या वैयक्तिक आयुष्य व आरोग्यासह कुटुंबाचे आरोग्यही धोक्यात येत आहे. त्याचप्रमाणे याचा समाजावरदेखील दूरगामी परिणाम होत आहे. आजची तरुणाई ही देशाचे भवितव्य आहेत. त्यामुळे तरुणांना सर्व प्रकारच्या नशांपासून दूर करणे, दुष्परिणाम रोखणे आणि समाज व्यसनमुक्त करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत रायगड जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्यावतीने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली. यावेळी राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जालिंदर पठारे, समाजकल्याण विभाग अधिकारी सुनिता मते, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनिल भोपळे, यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







