गोळीबार करणारा निखिल यादव, तर कोयत्याने हल्ला करणारा नितेश पवार पोलिसांच्या ताब्यात
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मानपाडा परिसरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेला महत्त्वाचे यश मिळाले आहे. फरार झालेल्या दोन मुख्य आरोपींना मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा येथून ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. निखिल यादव आणि नितेश पवार ऊर्फ भावड्या अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांना न्यायालयाने आठ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप पूर्णेकर हे आपल्या कार्यालयाबाहेर असताना तोंडाला मास्क लावलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर कोयत्याने हत्या केली. 29 सप्टेंबरला ही हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर ठाण्यामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. दबावमुक्त व व निष्पक्ष तपासाची मागणी शिवसेना नेत्यांकडून करण्यात आली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची सूत्रे गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली. पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली 23 जणांचे विशेष पथक तयार करण्यात आले. वेगवेगळ्या माध्यमातून हल्लेखोरांचा शोध सुरु करण्यात आला होता. अखेर मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा परिसरात त्यांचा वावर असल्याची माहिती उपायुक्त अमरसिंह जाधव यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाळा परिसरात छापा टाकून टाकून निखिल यादव आणि नितेश पवार यांना ताब्यात घेतले. या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले.







