ऑनलाईन कामांचा होतय खोलंबा; मोबाईल टॉवर उभारण्याची मागणी
| म्हसळा | प्रतिनिधी |
सध्या सगळं जग ऑनलाईन झाले असताना रायगड जिल्ह्यामधील म्हसळा तालुक्यातील घुम गाव व पंचक्रोशी परिसर मात्र अजूनही मोबाईल नेटवर्कपासून वंचित आहे. या परिसरात घुम, रुद्रवट, कोकबल, ठाकरोली, सांगवड, कृष्णनगर, कोलवट, भापट, रातीवणे, ताम्हणे करंबे, नेवरूळ, सकलप कोंड, अशी गावे आहेत.
या गावंमध्ये अंदाजे पंधराशे पेक्षा अधिक कुटुंबे राहतात, तरी देखील गावात कोणत्याही कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे घुम गावासाह या आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांना रोजच्या जीवनात खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सणासुदीला किंवा सुट्टी असेल तर मुंबईला राहणारे नोकरदार वर्ग गावी आले तर त्यांना एखादे वर्क फ्रॉम होम संबंधित कामे करायची असतील तर ती कामे देखील होत नाहीत परिणामी त्यांना नाराज होऊन पुन्हा कामासाठी मुंबई गाठावी लागते. गावात नेटवर्क नसल्यामुळे मोबाईलवर बोलणे देखील मुश्किल झाले आहे. फोन लावायचा असेल तर गावाबाहेर, डोंगरावर, उंच ठिकाणी जावे लागते. अनेक वेळा महत्त्वाचा फोन लागत नाही, त्यामुळे अनेक कामे अडकून पडतात.
तरुण वर्ग त्रस्त
गावातील तरुण वर्गाला याचा सर्वात जास्त फटका बसत आहे. नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करणे, ऑनलाईन परीक्षा देणे, शिक्षणासाठी ऑनलाईन अभ्यास करणे, शासकीय योजनांची माहिती घेणे ही सर्व कामे मोबाईलवरच करावी लागतात. पण नेटवर्क नसल्यामुळे तरुणांना गाव सोडून तालुक्याच्या ठिकाणी किंवा दुसऱ्या गावात जावे लागते. त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो.
ऑनलाईन कमांमध्ये अडसर
शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत यांची सर्व कामे आता ऑनलाईन झाली आहेत. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन रेकॉर्ड, हजेरी, अंगणवाडीचे अहवाल, ग्रामपंचायतीचे ऑनलाईन कामकाज, दाखले, शासकीय योजनांचे फॉर्म हे सर्व मोबाईल नेटवर्कशिवाय होऊ शकत नाहीत. परिसरातील शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक, आशासेविका, बचत गटाच्या महिला सीआरपी, तलाठी अशा सर्वच शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांना काम करण्यासाठी रोजच संघर्ष करावा लागत आहे.






