अलिबागमध्ये नव्या पिढीच्या वक्तृत्वाला मिळणार हक्काचं व्यासपीठ
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षी पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी विद्यार्थी संघटना, पुरोगामी युवक संघटना, सांस्कृतिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हास्तरिय खुली वक्तृत्व स्पर्धा अलिबागमधील शेतकरी भवन येथे शनिवारी (दि.3) सकाळी नऊ वाजता सुरु होणार आहे. मीनाक्षी पाटील यांच्या अभ्यासू आणि प्रभावी वक्तृत्वाची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या नाविन्य उपक्रमातून नव्या पिढीच्या वक्तृत्वाला आज व्यासपीठ मिळणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
शेतकरी, कामगार, कष्टकरी जनतेच्या न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या, महिलांचे प्रश्न सातत्याने विधिमंडळात मांडणाऱ्या शेकापच्या नेत्या, माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षी पाटील यांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पत्रकारिता अशा अनेक क्षेत्रात मोलाचे योगदान राहिले आहे. आपल्या राजकीय कारकीर्दीत तळागाळातील प्रश्न अभ्यासू वृत्तीने सातत्याने मांडण्याचे काम स्व. मीनाक्षी पाटील यांनी केले आहे. विधिमंडळात अभ्यासपूर्ण भाषणे आणि आक्रमक भूमिका ही त्यांची विशेष ओळख होती. आपल्या वक्तृत्वाची एक वेगळी छाप त्यांची राहिली आहे. यांच्या आठवणींना उजाळा देण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये वाचन, अभ्यास, विचार मांडण्याची क्षमता आणि प्रभावी वक्तृत्व विकसित व्हावे, या उद्देशाने शेकापच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
स्व. मीनाक्षी पाटील यांच्या सार्वजनिक जीवनात वक्तृत्व, नेतृत्व आणि सामाजिक प्रश्नांवरील सातत्यपूर्ण भूमिका यांना विशेष महत्त्व होते. त्यामुळे अलिबागमध्ये स्व. मीनाक्षीताई पाटील स्मृती रायगड जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा घेतली जाणार आहे. ‘आजचा विद्यार्थी आणि उद्याचा भारत’, ‘रायगडचा विकास आणि जनतेची अपेक्षा’, ‘सत्तेच्या सिंहासनावर नव्हे, जनतेच्या हृदयात घर करणारी ताई- मीनाक्षीताई’, ‘कलम जब जागती है तब सत्ता कांपती है, मजबुती का नाम महात्मा गांधी’, ‘जखमी लोकशाहीच्या कपाळावर आशेचे कुंकू लावतीय मी’ अशा वेगवेगळ्या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विजेत्याला 15 हजार एक रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला 11 हजार एक रुपये व चषक, तृतीय क्रमांकाला सात हजार एक रुपये व चषक, चतुर्थ क्रमांकाला पाच हजार एक आणि चषक, पाचव्या क्रमांकाला तीन हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच पाच उत्तेजनार्थ म्हणून पाच बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रोख व चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे.






