पर्यटकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत
| आगरदांडा | प्रतिनिधी |
जागतिक वारसा सप्ताहानिमित्त ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी पुरातत्त्व विभागाकडून प्रवेश शुल्क माफ करण्यात आले. या उपक्रमाचा शेकडो पर्यटकांनी लाभ घेतला. यावेळी किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी प्रितेश जाटव आणि कल्याण कुमार झा यांनी किल्ल्यात येणाऱ्या पर्यटकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या उपक्रमामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी पुरातत्त्व संशोधन विभागाचे सहायक संवर्धक बजरंग येलीकर यांनी जागतिक वारसा सप्ताहाचे महत्त्व विशद केले.
मुरूड हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण असून, येथे अनेक ऐतिहासिक वारसा स्थळे आहेत. या वास्तू पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. आपल्या ऐतिहासिक वास्तू, संस्कृती आणि वारसा यांचे सौंदर्य टिकवून ठेवणे तसेच त्यांचे संवर्धन व संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले. ऐतिहासिक वास्तू आणि वारसा स्थळे आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासाची ओळख करून देतात. मात्र, विविध कारणांमुळे या वास्तूंचे नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने जागतिक वारसा सप्ताह साजरा केला जातो, असेही येलीकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सकाळपासूनच जंजिरा किल्ला पाहण्यासाठी लहान मुलांसह अंदाजे एक हजार पर्यटकांनी किल्ल्याला भेट दिल्याची माहिती पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी प्रितेश जाटव यांनी दिली.






