| रत्नागिरी | प्रतिनिधी |
विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या परंपरेतील पहिले कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन रविवारी (दि.29) खेड येथे संपन्न होत आहे. या संदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रसिद्ध शिक्षण व कायदे तज्ज्ञ ॲड. तु.ल. डफळे यांची संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
ॲड. तु.ल. डफळे हे 2002 सालापासून कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबईचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. ते टीबीके कॉलेज ऑफ सायन्स आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, भरणेचे चेअरमन आहेत. तसेच, त्यांनी कोकणरत्न कला कॉलेज भरणेच्या स्थापनेस महत्त्वपूर्ण हातभार लावला आहे.
शिक्षण हे समाज घडवण्याचे प्रभावी साधन असल्याचे मनाशी बाळगून त्यांनी खेड तालुका व ग्रामीण परिसराच्या शैक्षणिक व समाज कल्याणाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कुणबी समाजोन्नती संघाचे 1972 पासून सक्रिय सदस्य असलेल्या ॲड. तु. ल. डफळे यांनी कुळ कायद्यांतर्गत हजारो शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. अशा कायदे व शिक्षण तज्ज्ञ म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या ॲड. डफळे यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.






