महिला भगिनींशी साधला संवाद
| अलिबाग | प्रतिनिधी |
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील विविध सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना सदिच्छा भेटी देत देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उपस्थित नागरिक बंधू-भगिनींशी संवाद साधत सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती, श्रद्धा आणि स्त्रीशक्तीच्या सन्मानाचा उत्सव मानला जातो. या उत्सवाच्या माध्यमातून समाजात एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत होतो.
सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या माध्यमातून धार्मिक परंपरा जपण्याबरोबरच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये एकजुटीची भावना अधिक दृढ होत असते. चित्रलेखा पाटील यांनी मंडळांना दिलेल्या भेटीदरम्यान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्या या सदिच्छा भेटींमुळे मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नवरात्रोत्सवाच्या या पवित्र पर्वात देवीच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, तसेच समाजात शांतता, बंधुभाव आणि एकोपा कायम राहो, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या. या भेटी दरम्यान, अनेक महिला, महिला मंडळाच्या सदस्या मोठ्या संख्यने उपस्थित होत्या.








