विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांची घेतली भेट
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
नावडे वसाहतीमध्ये मागील आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांच्या निवासस्थानी धाव घेत आपली व्यथा मांडली.
नागरिकांनी सांगितले की, वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
यावेळी अरविंद म्हात्रे यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात महापालिका अपयशी ठरत आहे. पाणीटंचाईसारख्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे अजिबात सहन केले जाणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला. तसेच, पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांनी आगामी महापालिकेच्या महासभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करत ‘या प्रश्नावर सभागृहात आक्रमकपणे जाब विचारला जाईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. नावडे वसाहतीतील पाणीप्रश्नामुळे प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.







