जीव धोक्यात घालून पादचाऱ्यांचा प्रवास
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव शहरातील वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जुने माणगाव येथील तिनबत्ती चौक पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरत आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे या चौकात दररोज जीव धोक्यात घालून नागरिकांना रस्ता ओलांडावा लागत आहे. काही जण गंभीर जखमी होत आहेत, तर काहींना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवावेत, अशी तीव्र मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील तिनबत्ती चौकाची रचना अत्यंत धोकादायक ठरली आहे. काळ नदीच्या पुलानंतर असलेला तीव्र उतार आणि गोव्याच्या दिशेने येताना कोणत्याही प्रकारचे वेग नियंत्रण साधन नसल्याने वाहनांचा वेग अनियंत्रित होतो. परिणामी, क्षणात अपघात घडतात आणि निरपराध नागरिकांना त्याची किंमत जीव गमावून चुकवावी लागते. अनेकदा झालेल्या अपघातांनंतरही संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गतवर्षी स्थानिक रहिवासी रफिक जामदार या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर नागरिकांचा संताप अनावर झाला होता. त्यांनी महामार्ग रोखून आंदोलन करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अधिकाऱ्यांनी गतिरोधक बसवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. परिणामी, अपघातांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे.
या परिसरातून दररोज हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवास करतात. जिल्हा न्यायालय, द.ग. तटकरे महाविद्यालय, अशोक दादा साबळे विधी महाविद्यालय, गीता तटकरे नर्सिंग कॉलेज तसेच विविध माध्यमांच्या शाळा याच भागात असल्यामुळे सुमारे 5 हजार विद्यार्थी या मार्गावरून ये-जा करतात. या लहानग्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. महामार्ग अरुंद असल्यामुळे आणि वाहतुकीचा प्रचंड ताण असल्यामुळे या चौकात सतत कोंडी होत असते. काही वेळा तर वाहनांच्या रांगा किलोमीटरपर्यंत वाढतात. अशा परिस्थितीत एखादा अपघात झाला तर परिस्थिती आणखी भीषण बनते. ज्येष्ठ वकील व विधी महाविद्यालयाचे चेअरमन ॲड. विनोद घायाळ यांनीही या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवण्याची गरज अधोरेखित केली आहे.
सध्या काळ नदीवरील नवीन पुलाचे काम सुरू असल्याने वाहतुकीवर अधिक ताण निर्माण झाला आहे. त्यातच या महत्त्वाच्या चौकात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त नसल्याने शिस्तीचा अभाव जाणवतो. तीनबत्ती चौक ते ढालघर फाटा या एक किलोमीटरच्या पट्ट्यात वारंवार कोंडी होत असून नागरिकांना तासनतास अडकून पडावे लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि पालकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. जर तात्काळ गतिरोधक बसवले नाहीत, तर आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल. त्यामुळे आज गरज आहे ती केवळ आश्वासनांची नव्हे, तर तातडीच्या कृतीची. कारण प्रत्येक दिवसासोबत एखाद्या निष्पाप जीवाचा प्रश्न या चौकात उभा राहत आहे. प्रशासनाने वेळेत निर्णय घेतला, तर अनेकांचे जीव वाचू शकतात. अन्यथा ही वेदनादायी साखळी कायम राहण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.





