| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याचे व गतिरोधक टाकण्याचे आवाहन स्थानिकांनी केले होते. त्यावर जिल्हा परिषद सदस्या सुनीता मोरे आणि कर्जत पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांनी नेरळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून नेरळ गावातील बहुसंख्य रस्त्यावर खड्डे बुजविण्यासाठी व गतिरोधक टाकण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ संकुल प्राधिकरण मधील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवावेत, अशी मागणी नेरळ ग्रामस्थांकडून सुरू होती. त्याचवेळी काँक्रिट रस्त्यावर लावण्यात आलेले फायबर गतिरोधक निघून गेल्याने वाहने सुसाट वेगात जात होती. ही बाब लक्षात घेऊन नेरळ गावातील रस्त्यांवर गतिरोधक टाकण्यात यावे अशी मागणी स्थानिकांनी जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे आणि पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांच्या कडे केली होती. त्यानुसार त्यांनी जिल्हा परिषदेकडे पत्र व्यवहार केला आणि नेरळ संकुल प्राधिकरण कडून ही कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली. त्यानंतर नेरळ संकुल विकास प्राधिकरण कडून दोन बोझर डांबर नेरळ मध्ये पोहचली. त्यात पहिल्या दिवशी नेरळ गावातील खांडा, मोहाची वाडी, बाजारपेठ, पाडा, टेप आळी, ग्रामपंचायत कार्यालय परिसर इत्यादी भागातील रस्त्यावरील खड्डे बुंजवून गतिरोधक टाकण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नेरळ पूर्व भागातील निर्माण नगरी, पाडा मातोश्री नगर आणि कोल्हार रस्त्यावर खड्डे भरण्याची आणि गतिरोधक बनवण्याची कामे पूर्ण करण्यात आली.





