| आगरदांडा | प्रतिनिधी |
जीवनात यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी अथक परिश्रमाने अभ्यास करून यश प्राप्त करावे व गुणवत्तेची कास धरावी. जेणेकरून जीवनात आपल्याला उचित ध्येय गाठता येते. शालेय जीवनात अभ्यासाकडे सर्वाधिक लक्ष देणे गरजेचे आहे. मी ही सर.एसए. हायस्कूलमध्ये शिकत असताना जिद्द व चिकाटी सोडली नाही. खुप मेहनत घेतली आणि यश संपादन केले. आज मी डॉक्टर आहे. माझा मुलगा डॉ. मयुर तुमच्या अंजुमन सायन्स कॉलेजमध्ये 11 वी, 12वी शिकला. त्यावेळी त्यानीही जिद्द, चिकाटी व अथक परिश्रम घेतले आणि डॉक्टर झाला. तुम्ही देखील अथक परिश्रम घेऊन आपले स्वतःचे विश्वविक्रम बनवा आणि पुढे जा. जेणेकरुन भविष्यात आपण देखील मोठे अधिकारी बनाल आणि आपल्या आई-वडीलांचे व शाळेचे नाव उज्ज्वल कराल. त्याकरिता विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी कठोर परिश्रम केले पाहिजे. असे प्रतिपादन मुरूड शहरातील ज्येष्ठ डॉ. राज कल्याणी यांनी केले.
नुकताच मुरूड -जंजिरा अंजुमन इस्लाम हायस्कूल आणि विज्ञान-कला कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव व कला कनिष्ठ महाविद्यालयाचा रौप्यमहोत्सव समारंभ पार पडला. यावेळी ते बोलत होते. या समारंभला ॲड. अन्वर हुसेन, डॉ. मंगेश पाटील, ॲड. मोहन तांबडकर, डॉ. मकबुल कोकाटे, रहिम कबले, डॉ. शकील परदेशी, डॉ. वसीम पेशमाम, अंजुमन डीग्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. साजिद शेख, अल्ताफ मलीक आदिंसह विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.







