| कर्जत | प्रतिनिधी।
ऐतिहासिक वारसा जतन करणे आणि गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखणे या उद्देशाने राजा शिवछत्रपती परिवार अंतर्गत रायगड विभागाच्या वतीने कर्जत तालुक्यातील किल्ले भिवगडावर रविवार 29 मार्च रोजी भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. रायगड परिवाराची ही 91 वी विभागीय मोहीम यशस्वीपणे पार पडली असून, यामध्ये दुर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होत श्रमदान केले.
मोहिमेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. राष्ट्रगीताच्या गायनाने आणि त्यानंतर परिवार ध्येयमंत्र, छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणामंत्र व शिवगर्जना (गारद) देऊन संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. या वातावरणाने उपस्थित मोहीम वीरांमध्ये नवा उत्साह आणि राष्ट्रभक्तीची भावना संचारली असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.
कर्जत जवळील वदप, गौरकामत गावाच्या हद्दीत असलेला हा ऐतिहासिक भिवगड किल्ला निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी आकर्षणाचे केंद्र आहे. या मोहिमेअंतर्गत गडावरील प्राचीन पाण्याच्या टाक्यांमधील साचलेला गाळ उपसून पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात आल्या. तसेच, संपूर्ण गड परिसरात विखुरलेला कचरा गोळा करून किल्ला प्लास्टिकमुक्त करण्यात आला.
एका दिवसात सहज सर करता येण्याजोगा हा किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. अशा वारसा स्थळांचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थित राजा शिवछत्रपती सदस्यांनी व्यक्त केले. निसर्गाचा आनंद घेतानाच गडाचे ऐतिहासिक महत्त्व जपण्याचे आवाहनही ‘राजा शिवछत्रपती परिवारा’कडून करण्यात आले आहे.





