25 वर्षांपासून एकाच जागी ठिय्या
| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्हा रुग्णालयात तब्बल 25 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या हेमंत हरिश्चंद्र भोपी यांच्या सेवाकालाबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. 1999 साली शिपाई म्हणून रुजू झालेले भोपी आजही त्याच ठिकाणी कार्यरत असून, इतक्या दीर्घ काळात त्यांची बदली किंवा विभागीय फेरबदल न झाल्याने ‘भोपींना नेमका वरदहस्त कोणाचा?’ हा सवाल जोर धरू लागला आहे.
शासकीय सेवेत ठराविक कालावधीनंतर बदली प्रक्रिया राबवली जाते, जेणेकरून पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत संतुलन राखले जाईल. मात्र, भोपी यांच्या बाबतीत तब्बल 25 वर्षांचा कालावधी उलटूनही एकाच ठिकाणी ठिय्या कायम असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही बाब केवळ अपवादात्मक नसून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.
विशेष म्हणजे, गेल्या दहा वर्षांपासून हॉस्पिटल रजिस्ट्रेशन आणि एमटीपी रजिस्ट्रेशनसारख्या महत्त्वाच्या टेबलवर ते सातत्याने कार्यरत असल्याची तक्रार आहे. आर्थिक व्यवहाराशी संबंधित काम एकाच व्यक्तीकडे इतक्या दीर्घकाळ राहणे ही बाब कामाबाबत संशय निर्माण करणारी असल्याचे बोलले जात आहे. “एकाच ठिकाणी, एकाच टेबलवर इतकी वर्षे कसे?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेल्या 25 वर्षांपासून ते नियोजन विभागाशी संबंधित कामांमध्ये सक्रिय असल्याचे सांगितले जाते. या विभागात दीर्घकाळ एकाच व्यक्तीचा प्रभाव राहिल्याने विविध स्तरांवर चर्चा रंगू लागली आहे. दीर्घकाळ एकाच जागी कार्यरत राहिल्यामुळे कामकाजात पारदर्शकतेचा अभाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भोपींना इतकी वर्षे एकाच ठिकाणी टिकून राहणे शक्य कसे झाले? यामागे कोणाचे पाठबळ आहे? प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष का केले गेले? असे अनेक प्रश्न आता उघडपणे विचारले जात आहेत. इतक्या वर्षांत बदली न होणे, प्रशासनाकडून कोणतीही ठोस हालचाल न दिसणे, यामुळे या प्रकरणाची चर्चा अधिकच रंगत चालली आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणावर स्पष्ट भूमिका घेणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. नियमांनुसार बदली प्रक्रिया का राबवली गेली नाही? यामागे नेमके कारण काय? याची माहिती समोर येणे गरजेचे आहे.
एकूणच, हेमंत भोपी यांचा 25 वर्षांचा एकाच ठिकाणी असलेल्या कार्यकाळाबाबत आता चर्चा रंगत असून, यामागील वास्तव काय आहे, याचा शोध घेण्याची मागणी होत आहे. प्रशासन या प्रश्नांना उत्तर देणार का? आवश्यक ती पावले उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






