| नवी मुंबई | प्रतिनिधी |
शहरातील वाहतूक व्यवस्थेत शिस्त राखण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी वाहतूक शाखेतील पोलिसांना अत्याधुनिक बॉडी कॅम मशिन्स दिल्या आहेत. या मशिन्समुळे कारवाईदरम्यान होणारे सर्व संभाषण आणि घडामोडी रेकॉर्ड होणार आहेत.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना अनेकदा शाब्दिक वाद, गैरवर्तन किंवा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होत असल्याच्या घटना समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर पारदर्शकता वाढवणे आणि पोलिसांवर होणारे आरोप-प्रत्यारोप टाळण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या बॉडी कॅममध्ये उच्च दर्जाचे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंगची सुविधा असून, रेकॉर्ड केलेला डेटा सुरक्षित सर्व्हरवर साठवला जाणार आहे. त्यामुळे गरज भासल्यास तपासासाठी किंवा पुरावा म्हणूनही त्याचा उपयोग होऊ शकतो. तसेच, या मशिन्समुळे पोलिसांच्या कामात शिस्त, जबाबदारी आणि विश्वासार्हता वाढणार असून, नागरिकांनाही योग्य वर्तन करण्यास प्रवृत्त केले जाईल. नियमभंग करणाऱ्यांवर त्वरित आणि योग्य कारवाई करण्यात अधिक सोपे होणार आहे.







