| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग कल्याणकारी योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दिव्यांग निधी वाटप व आर्थिक लाभ वितरण कार्यक्रम मंगळवार दि. 7 रोजी दुपारी एक वाजता कम्युनिटी सेंटर हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आला. पारदर्शकतेसाठी ही लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. यातील पहिला टप्पा आठ हजार रुपये देण्यात आला आहे.
वर्षाला सोळा हजार रुपये या दिव्यांग बांधवांना नगर परिषदेच्या राखीव निधीतील उत्पन्नातून पाच टक्के रक्कम ही दिव्यांग बांधवांना मदत म्हणून दिली जाते. यावेळी मुख्याधिकारी राहुल इंगळे, दिव्यांग समितीच्या विद्यमान सभापती रिजवाना शेख, मानव सेवा दिव्यांग कल्याणकारी संस्था अध्यक्ष चंद्रकांत जाधव, नगरसेवक सुनील शिंदे, प्रवीण सकपाळ, मनोज खेडकर, सोहेल महापुळे, केतन रामाने, नगरसेविका लता ढेबे, सुरेखा साळुंखे, ऐश्वर्या तोरणे, अर्चना भिल्लारे, कमल गायकवाड, प्रतिभा घावरे आदी उपस्थित होते.
लाभार्थ्यांना या निधीतून स्वयंरोजगार प्राप्त व्हावा त्याचप्रमाणे त्यांनी आरोग्यासाठी विमा काढल्यास त्यांना भविष्यात जो काही आरोग्यासाठी होणारा आवश्यक खर्च आहे त्यासाठी उपयोगी पडू शकतो. सध्या माथेरानमध्ये चाळीस दिव्यांग व्यक्ती असून, त्यांना वेळोवेळी समस्या भासतात त्यावेळी मानव सेवा दिव्यांग कल्याणकारी संस्था अध्यक्ष चंद्रकांत जाधव हे सहकार्य करीत आहेत. नगरपरिषद दिव्यांग समिती सभापती रिझवाना शेख यांनी सुध्दा आपल्या परीने शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना राबविण्यात येतात त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत.




