1,511 लाभार्थ्यांना निर्वाह भत्ता मंजूर
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या 2025-26 च्या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार अतितीव्र दिव्यांग व्यक्तींना निर्वाह भत्ता देण्याची योजना प्रत्यक्षात आली असून, जिल्ह्यातील 1,511 पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी 16 हजार रुपयांचा एकरकमी लाभ मंजूर करण्यात आला आहे.
रायगड जिल्हा परिषदेने 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये अतितीव्र दिव्यांग व्यक्तींना आर्थिक आधार देण्यासाठी निर्वाह भत्ता योजना जाहीर केली होती. या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली असून, जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींकडून अर्ज व प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या प्रस्तावांची सखोल छाननी करून एकूण 1,511 पात्र दिव्यांग लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
या निवड झालेल्या प्रत्येक लाभार्थ्याला प्रत्येकी 16 हजार रुपये इतका एकरकमी आर्थिक लाभ मंजूर करण्यात आला असून, ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात आली आहे. त्यामुळे दिव्यांग कल्याण विभागाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमातून जिल्ह्यातील दीड हजारांहून अधिक दिव्यांगांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या योजनेसाठी निधी हा जिल्हा परिषदेच्या पाच टक्के दिव्यांग कल्याण सेस निधीतून उपलब्ध करून देण्यात आला आहे. योजनेचा लाभ देण्यासाठी पात्रता निकष, अटी व शर्ती तसेच आवश्यक कागदपत्रांची स्पष्ट रूपरेषा निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार लाभार्थ्यांचे दिव्यांगत्व प्रमाण किमान 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक होते. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक किंवा सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले दिव्यांगत्व प्रमाणपत्र असणे बंधनकारक ठेवण्यात आले होते.
याशिवाय केंद्र शासनाच्या नव्या कायद्यानुसार यूडीआयडी प्रमाणपत्र असणे अनिवार्य करण्यात आले होते. या सर्व निकषांच्या आधारे 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर प्राप्त प्रस्तावांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली.
दरम्यान, ज्या पात्र दिव्यांग व्यक्तींनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांनी आपल्या बँक खात्यात लाभाची रक्कम जमा झाली आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.





