लढाईसाठी संघर्ष समितीचा पुढाकार; सर्वांनी एकत्र येण्याची गरज
| चिरनेर | प्रतिनिधी |
एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समितीची बैठक विंधणे येथील समितीचे सहखजिनदार जयवंत पाटील यांच्या निवासस्थानी शनिवारी (दि.11) पार पडली. यावेळी सरकारचे शेतकरी विरोधी धोरण, समितीची गरज, समितीचे आजवरचे काम, 12.5 % व 22.5% नेमके काय व याद्वारे शेतकऱ्यांची आजवर झालेली फसवणूक, 2013 चा भूसंपादन कायदा त्याचे फायदे, गावठाण विस्तार, गावठांणाबाहेरील घरांचा प्रश्न, समितीच्या मागण्या, मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री, अन्य मंत्री, आमदार, खासदार आदींना केलेला पत्रव्यवहार याबाबतची माहिती यावेळी देण्यात आली.
सिडको, जेएनपीटी, नवी मुंबई विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांची झालेली फसवणूक डोळ्यासमोर आहे. संघर्ष केल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. अलिबाग- विरार कॉरिडोरचे काम शेतकऱ्यांनी रोखून धरत 2013च्या भूसंपादन कायद्याचा आग्रह धरला. आज येथील शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावठाणाबाहेरील शेवटच्या घर नियमित होऊन सरंक्षण मिळवणे गावठाणाबाहेरील किमान मीटर परिघातील जमिनी राखून ठेवणे या आपल्या मागण्या आहेत. भूसंपादनाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाजूने लागलेले न्यायालयीन निकाल महत्वपूर्ण असून, 124 गावांच्या भूसंपादनबाबत सरकार जुमानले नाही तर समितीला न्यायालयीन मार्गाचा अवलंब करावा लागेल.
या बैठकीला अध्यक्ष सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष संतोष ठाकूर, सरचिटणीस रूपेश पाटील, सहसचिव प्रकाश पाटील, गोपाळ जोशी, महेंद्र पाटील राजाराम जोशी, अनिल नारंगीकर, सुनील जोशी, मनोहर ठाकूर, संजय ठाकूर, नामदेव ठाकूर, दिपक ठाकूर, गणेश पाटील, हिराजी नवाले, धनाजी नवाले, अविनाश नवाले, राजेश कोळी, जोमा कोळी, अशोक कोळी, केतन पाटील, चंद्रकांत घरत, मनोज चिरलेकर, अमेय पितळे, सुनील पाटील, सुधर्मा घरत, श्रीनिवास पाटील, शशिकांत ठाकूर, कैलास भोईर, वि ग म्हात्रे, दत्ताराम शेळके, सुरेश पाटील यांच्यासह शीला राऊत, ताराबाई कडू, भागूबाई ठाकूर, शीला वाकडे, जयश्री पाटील, शशिकला घरत आदी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी स्वागत गोपाळ जोशी यांनी तर आभार दत्ता बुवा पाटील यांनी केले.
सेझ आंदोलन सुरू असताना दलाल कार्यरत होते ते आजही आहेत. ते शेतकऱ्यांना अमिषे दाखवतात भीती घालतात आणि जमिनीची विक्री करण्यास भाग पाडतात. दलालांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता जमीन विकण्याची घाई शेतकऱ्यांनी करू नये. ही लढाई आपल्या न्यायहक्कांची आहे. केवळ जमीन नाही तर घर आणि गावं वाचवण्याची तसेच आपल्या समाजाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने एकजुटीने संघर्षाला तयार रहावे.
सुधाकर पाटील
अध्यक्ष
प्रकाश पाटील
शेती घरादारावर संकट आले असतानाही शेतकऱ्यांत उदासीनता आहे. आपलं भविष्य अंधारात असताना तरुण खेळ आणि मौज मजा करण्यात व्यस्त आहेत. समिती व्यापक जनजागृती करत आहे त्याला सर्वांनी साथ देणे गरजेचे आहे.
सहसचिव







