जलजीवन योजनेचे पाणी कागदावरच!; 24 हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशनवर कोट्यवधी खर्च होऊनही वास्तव धक्कादायक समोर आले आहे. आमदार आणि मंत्र्यांच्या मतदारसंघातील गावांमध्येच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, तब्बल 24 हजार नागरिकांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
रायगड जिल्ह्यात केंद्र शासन पुरस्कृत जलजीवन मिशन योजना मोठ्या गाजावाजात राबविण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात आमदार व मंत्र्यांच्या मतदारसंघातील गावांमध्येच पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याचे वास्तव समोर आले आहे. अलिबाग, पेण आणि महाड तालुक्यातील तब्बल 24 हजार नागरिकांना आजही पाण्याची प्रतीक्षा करावी लागत असून, 69 ठिकाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये 59 वाड्या आणि 10 गावांचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. जिल्हा परिषदेचे पाझर तलाव तसेच लघुपाटबंधारे विभागातील धरणांमध्ये केवळ 40 टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे नागरिकांवर पाणी जपून वापरण्याची वेळ आली असून, अनेक ठिकाणी एक दिवसाआड, दोन दिवसाआड तर काही भागात चार दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्यासाठी नागरिकांना अक्षरशः वणवण करावी लागत आहे.
अलिबाग तालुक्यातील रांजणखार डावली, रेवस आणि बोडणी या गावांमध्ये जलजीवन योजनेसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र, कामे अपूर्ण असल्याने आजपर्यंत नागरिकांना पाणी मिळालेले नाही. परिणामी, या गावांतील 6 हजार 479 नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाकडून दोन टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू असला तरी तो अपुरा ठरत असल्याची तक्रार आहे.
महाड मतदारसंघातील पिंपळकोंड, शेवते, मुमुर्शी यांसह चोचिंदे गौळवाडी, कुंभाडे धनगरवाडी, करंजाडी म्हसके कोंड, करंजाडी आदिवासीवाडी, रायगडवाडी, नेवाळेवाडी, तळीये, निगडे कदमवाडी, निगडे मोरेवाडी, निगडे खोतवाडी, निगडे मधलीवाडी, निगडे सावंतवाडी, निगडे उत्तेकरवाडी, रावतळी मानेधार, दबोल खडकवाडी, रावतळी, फौजदार कोंड, मुमुर्शी आदिवासीवाडी, अंब्याचा कोंड, टोल आदिवासीवाडी आदी भागात पाण्याची तीव्र टंचाई आहे.
पेण तालुक्यातील मसद खुर्द, मसद बुद्रूक, शिर्की, बोर्वे या गावांसह गणेशवाडी, आझादवाडी, लक्ष्मीवाडी, म्हात्रेवाडी, आक्कादेवीवाडी, गणेशवाडी सरेभाग वाशी, पाटुकळेवाडी, वर्तकवाडी, बायलाबंदर सरेभाग, सुदर्शनवाडी, ओमसाईवाडी, महादेववाडी, हनुमानवाडी मसद बुद्रूक, समर्थवाडी मसद बुद्रूक, बापुजीवाडी, प्रधानवाडी, निगडावाडी, दर्गावाडी, भेंडीचीवाडी, म्हसोबावाडी, सीमावाडी शिर्की, उफाडावाडी, माऊलीवाडी अशा 38 वाड्यांमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व भागांमध्ये प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी ती अपुरी ठरत आहे. जलजीवन योजनेवर मोठा निधी खर्च करूनही नागरिकांना मूलभूत पाण्यासाठी भटकावे लागत असल्याने प्रशासन व लोकप्रतिनिधींवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
टंचाईची धक्कादायक आकडेवारी
बाधित नागरिक : 24 हजार
टंचाईग्रस्त ठिकाणे : 69
वाड्या : 59
गावे : 10
टँकरद्वारे पाणी पुरवठा करणारे गावे वाड्यांवर दृष्टीक्षेप
| तालुके | गावे | वाड्या | एकूण | टँकर्स | लोकसंख्या |
| अलिबाग | 03 | 00 | 03 | 02 | 6479 |
| महाड | 03 | 21 | 24 | 03 | 1436 |
| पेण | 04 | 38 | 42 | 07 | 13136 |
| एकूण | 10 | 59 | 69 | 12 | 24041 |






