| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या द. ग. तटकरे महाविद्यालयात (दि.11) एप्रिल रोजी रसायनशास्त्रातील उदयोन्मुख प्रवाह: सीमांपलीकडील नवोपक्रम या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात व शैक्षणिक दिमाखात पार पडली. ग्रामीण भागात अशा दर्जेदार आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन होणे, ही माणगावच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली.
ही परिषद महाविद्यालयाच्या विज्ञान विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष तसेच अंजुमन इस्लाम डिग्री कॉलेज मुरुड-जंजिरा, वीर वाजेकर महाविद्यालय उरण, जी. एम. वेदक कॉलेज तळा, भाऊसाहेब नेने महाविद्यालय पेण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजीव अशोक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिषद यशस्वीपणे पार पडली. याप्रसंगी डॉ. गौतम राऊत, डॉ. विश्वनाथ पाटील, डॉ. मुकुंद तंटक, डॉ. संजय सोनावले डॉ. मधुकर बडगुजर यांनी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
या परिषदेचा मुख्य उद्देश जगभरातील संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञ यांना एकत्र आणून रासायनिक विज्ञानातील नव्या प्रगतीवर विचारमंथन करणे हा होता. सेंद्रिय, असेंद्रिय व भौतिक रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, नॅनोतंत्रज्ञान, हरित रसायनशास्त्र आणि औद्योगिक रसायनशास्त्र अशा विविध क्षेत्रांतील संशोधनाला या परिषदेमुळे चालना मिळाली.देशभरातील विविध राज्यांतील सुमारे 270 संशोधक व प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. ऑनलाईन सादरीकरणात 35, ऑफलाईन सत्रात 12 तर पोस्टर सादरीकरणात 22 संशोधकांनी आपले संशोधन सादर करून ज्ञानाची देवाणघेवाण केली. परीक्षक म्हणून डॉ. जगदीश ठाकूर, डॉ. गुरमीत वाधवा, डॉ. एस. डी. तुपारे आणि डॉ. विलास जाधवर यांनी उत्कृष्ट परीक्षण केले.
परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. बी. एम. खामकर, डॉ. सदानंद धारप, डॉ. सजिद शेख, डॉ. सचिन बंगाले, डॉ. आमोद ठक्कर, डॉ. योगेश बोराले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच संयोजक प्रा. मेहरीन डावरे, प्रा. शोएब खान, डॉ. गुरमीत वाधवा, प्रा. जे. व्ही. देवरे, डॉ. एम. एच. साळुंके आणि डॉ. पी. एम. खंडारे यांनी परिषदेच्या यशासाठी परिश्रम घेतले.







