वर्षभराच्या मेहनतीचे फळ पदरात पडल्याने शेतकरी सुखावला
| खांदेश्वर | प्रतिनिधी |
वर्षभर काळ्या मातीत घाम गाळला, पावसाच्या प्रत्येक सरीसोबत पिकाची काळजी घेतली आणि आता हातात आलेल्या पिवळ्याधमक भाताच्या कणसांनी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलवले आहे. काळ्या मातीतून पिवळे सोने पिकविणाऱ्या बळीराजाच्या कष्टाचे फळ आता घराघरांत दाखल होऊ लागले आहे. दिवाळीपासून पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात भातकापणी आणि झोडणीच्या कामांना वेग आला असून, शेतशिवार पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या लगबगीने गजबजले आहे.
पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात भातशेती हा अनेक शेतकरी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच नांगरणी, चिखलणी, भातलावणी आणि पिकाची निगा राखण्याची कामे शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पूर्ण केली. यंदा मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे भातपिकाला चांगला आधार मिळाला. त्यामुळे शेतशिवारात डोलणारी भाताची पिवळीधमक कणसे पाहून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या.
ऑक्टोबर महिन्यातील उन्हाचा फायदा घेत शेतकऱ्यांनी भातकापणीला सुरुवात केली. कापलेले भात वाळवून त्याची झोडणी करण्याची लगबग आता गावागावांत सुरू आहे. दिवाळीच्या सणासोबतच शेतातही कष्टाच्या फळाचा आनंद साजरा होताना दिसत आहे. घरातील पुरुष मंडळींबरोबरच महिलावर्गही भात गोळा करणे, वाळवणे आणि झोडणीच्या कामात उत्साहाने सहभागी होत आहे. भात झोडणीनंतर मिळणारे धान्य म्हणजे शेतकऱ्यांसाठी वर्षभराच्या मेहनतीची खरी कमाई. घरच्या वापरासाठी वर्षभराचे धान्य साठवण्याबरोबरच काही शेतकरी भातविक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळवतात. त्यामुळे हातात आलेले पीक पाहून शेतकरी कुटुंबांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पनवेल तालुक्यात शहरीकरणाचा वेग वाढत असताना अनेक ठिकाणी शेतीक्षेत्र कमी होत आहे. मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही ग्रामीण भागातील शेतकरी भातशेतीची परंपरा जपत आहेत. पावसाळ्यात चिखलात राबणाऱ्या हातांना आता भाताच्या रूपाने सोन्यासारखे पीक मिळत आहे. दिवाळीच्या रोषणाईसोबतच शेतात पसरलेला पिवळ्या धान्याचा सडा बळीराजासाठी खऱ्या अर्थाने आनंदाची दिवाळी ठरत आहे.







