| बोर्लीपंचतन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेत अज्ञातांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मोडतोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे शाळेच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
शाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञातांनी शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली असून एक कॅमेरा कन्या शाळेच्या आवारात फेकलेला आढळला, तर दुसरा कॅमेरा गायब आहे. तसेच शाळेचे कुलूप तोडण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले आहे. शाळा बंद असताना किंवा सुट्टीच्या दिवशी हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, संबंधित सीसीटीव्ही कॅमेरे काही दिवसापासून बंद अवस्थेत होते त्यांची दुरुस्ती लवकरच करुन घेण्यात येणार होती. मात्र, त्यापूर्वीच या कॅमेऱ्यांची तोडफोड झाल्याने संशय वाढला आहे. या घटनेमुळे भविष्यात शाळेतील संगणक, प्रिंटर, प्रोजेक्टर, विविध महत्त्वाच्या नोंदी रजिस्टर तसेच पोषण आहार साहित्य यांची चोरी किंवा नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. शाळा व्यवस्थापन समितीकडून या प्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञातांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, तसेच शाळा परिसरात पोलिसांकडून नियमित गस्त घालण्यात येईल, असे आश्वासन शाळा व्यवस्थापन समितीला दिले आहे.






