| डेहराडून | वृत्तसंस्था |
उत्तराखंडमधील चारधाम यात्रा 2026 आता अधिक हाय-टेक आणि सोयीस्कर होणार आहे. यात्रेकरूंची वाढती संख्या लक्षात घेऊन परिवहन विभागाने पहिल्यांदाच काही क्रांतिकारी पावले उचलली आहेत. त्यामध्ये दुर्गम भागात दुर्गंधीमुक्त स्वच्छतागृहे आणि प्रवाशांना ट्रॅव्हल किट देण्याचा समावेश आहे.
परिवहन विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, यात्रेकरूंचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी अनेक नवीन सुविधांची अंमलबजावणी केली जात आहे. परिवहन विभाग पहिल्यांदाच प्रवाशांना एक उपयुक्त कीट देणार आहे. या किटमध्ये प्रवासादरम्यान लागणाऱ्या 5 महत्त्वाच्या वस्तू असणार आहेत. त्यात ओमेटींग बॅग, यूरिनल बॅग, सॅनिटायझर, वेट वाइप्स, कचरा पिशवी या वस्तूंचा समावेश असणार आहे. ही किट चेकपोस्टवर वाहनातील प्रवाशांच्या संख्येनुसार मोफत दिली जाणार आहेत. त्याचबरोबर डोंगराळ भागात रेल्वेतील बायोटॉयलेटच्या धर्तीवर वॉटरलेस यूरिनल लावले जाणार आहेत. त्यामध्ये मूत्रामधून पाणी आणि युरिया वेगळे केले जाते. त्यामुळे दुर्गंधी येत नाही आणि परिसर स्वच्छ राहतो. नारसन चेकपोस्टवर वेटिंग रूमप्रवाशांना ग्रीन कार्ड काढण्यासाठी तासनतास थांबावे लागते. आता नारसन चेकपोस्टवर प्रवाशांसाठी प्रशस्त वेटिंग रूम बनवली जाणार आहेत. तसेच, येथे प्रवाशांसाठी कुलर, हाय-स्पीड इंटरनेट आणि मनोरंजनासाठी एलईडी टीव्हीची सोय असणार आहे. यात्रेच्या मार्गावर वाहतुकीचे नियम पाळले जावेत आणि प्रवाशांना मदत मिळावी यासाठी 9 फिरती पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच, डेहराडून आणि सोनप्रयाग येथे विशेष अस्थायी चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. परिवहन विभागाच्या या उपक्रमामुळे चारधाम यात्रेत स्वच्छतेचा दर्जा सुधारेल आणि प्रवाशांना होणारा त्रास कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







