जिल्ह्यातील नागरिकांचे हाल; कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्यांना परतीचा मार्ग स्विकारण्याची वेळ
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांसह रुग्णालयातील परिचारिका, ब्रदर्स आदींनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार (दि.21) पासून बेमुदत संप पुकारला. या संपात दहा हजारहून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. शासकीय कर्मचारी संपावर गेल्याने जिल्ह्यातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहे. गजबजणारे जिल्हाधिकारी, तहसील, उपविभागीय अधिकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला.
सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत स्पष्ट नियम जाहीर करणे, 1 मार्च 2024 पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्ती वेतन देणे, तसेच सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत (10:20:30) लाभ द्यावा आदींचा समावेश आहे. याशिवाय, निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणीही पुन्हा जोर धरत आहे. देशातील बहुतेक राज्यांमध्ये हा निर्णय लागू झाल्याचा दाखला देत महाराष्ट्रातही तो लागू करावा. राज्यातील शासकीय विभागांमध्ये सुमारे 35 टक्के पदे रिक्त असल्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण वाढत असल्याचेही निदर्शनास आणण्यात आले आहे. चतुर्थश्रेणी व वाहन चालकांच्या भरतीवर घातलेली बंदी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, तसेच सर्व कर्मचाऱ्यांसाठी व्यापक रोकडविरहित (कॅशलेस) आरोग्य विमा योजना लागू करण्याच्या मागण्या प्राधान्याने मांडण्यात आल्या आहेत. जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणे, नगरपालिका व नगरपरिषदांतील कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाचा प्रश्न सोडवणे, दीर्घकाळ कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घेण्यात यावे, अशा अनेक मागण्यांसाठी शासकीय कर्मचारी, रुग्ण विभागातील कर्मचारी यांनी मंगळवारपासून संप पुकारला आहे. रायगड जिल्ह्यातील असंख्य सरकारी कर्मचारी या संपात सहभागी झाले. अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालयासमोर सर्वांनी एकत्र येत घोषणा दिल्या. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय तसेच आरोग्य विभागाची कार्यालये कायमच नागरिकांनी गजबजलेली असतात. या कार्यालयात दाखले, व इतर कामांसाठी कायमच वर्दळ असते. मात्र, शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. तहसील कार्यालयासह अन्य शासकीय कार्यालयात वेगवेगळ्या कामांसाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाती परत जाण्याची वेळ आली. कार्यालयांमध्ये पुर्णपणे शुकशुकाट दिसून आला. या संपामध्ये राज्य सरकारी, निमसरकारी, कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र शासकीय परिचारिका संघटना, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनाचे पदाधिकारी, सदस्य या संपात सहभागी झाले आहेत. सुरेश पालकर, संदीप नागे, प्रभाकर नाईक, दर्शना पाटील आदींसह असंख्य कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षकांचा संपाला पाठींबा
रायगड जिल्ह्यातील शिक्षकदेखील या संपात सामील होणार होते. मात्र, सध्या परिक्षेचा हंगाम सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. या परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, परिक्षेवर त्याचा परिणाम होऊ नये, म्हणून रायगड जिल्ह्यातील शिक्षकांनी या संपात सहभाग घेतला नाही. परंतू या संपाला शिक्षकांचा पाठींबा असल्याचे सांगण्यात आले .







