। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
जयगड येथील नावेद-2 या बेपत्ता नौकेचा शोध आता सोनार यंत्रणेद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी दिली आहे. जयगड येथील नावेद-2 नौका बेपत्ता होऊन महिना झाला, तरी अजून या नौकेबाबत कोणतीही ठोस माहिती पुढे आलेली नाही. एका मालवाहू जहाजाची धडक बसून ही नौका बुडाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मात्र नौका बुडाली असेल तर काही तरी अवशेष पाण्यात तरंगताना दिसायला हवेत ते दिसत नाहीत. त्यातील एकच मृतदेह मिळाला आहे. त्यामुळे या नौकेचे अपहरण झालेले नाही ना, अशी शंका व्यक्त करण्यात आली. पोलिसांना तपासात काही धागेदोरे मिळाले आहेत. लवकरच त्याचा तपास होईल.
समुद्रात बुडालेल्या नावेद-2 या मच्छीमारी नौकेचा शोध तपास लागेपर्यंत सुरू ठेवला जाईल. प्राथमिकदृष्या ही नौका बुडाल्याचा अंदाज आहे. गुहागर- दाभोळ समुद्रात ही नौका बुडाली असून ज्या ठिकाणी बुडाल्याची शक्यता आहे, त्या दोन किमी परिसरामध्ये नौदलाचीही मदत घेणार सोनार प्रणालीचा उपयोग करून बुडालेली नौका कुठे आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. संशयास्पद जहाजावरही आमची नजर असून ते गोव्यात आहे, अशी माहिती कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी दिली.