| पनवेल | प्रतिनिधी।
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यावरून राज्य आणि केंद्र शासनाने स्थानिकांना संभ्रमात ठेवल्यानंतर आता स्थानिक भाजपा नेत्यांनीही पनवेल महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीला ‘दिबां’च्या नावाला असलेला विरोध दाखवून दिला आहे. दिबांबद्दल असलेली असुया त्यातून व्यक्त झाली आहे. स्थानिक, भूमिपुत्र, प्रकल्पग्रास्तांचा भाजपा नेत्यांनी पुन्हा विश्वासघात केल्याचे टीकास्त्र सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी सोडले आहे. कडू यांनी, गेल्या आठवड्यात महापौर नितीन पाटील आणि आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन दिले होते. त्यानंतर आमरण उपोषणाचे शस्त्र उगारताच अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी केलेल्या खुलाशातून लोकनेते दिबांच्या नावाला विरोध करताना मागील सत्ताधाऱ्यांनी ‘स्वराज्य’ नाव देण्याचा आ. प्रशांत ठाकूर यांच्या शिफारशीवरुन इमारत पूर्ण होण्याआधीच घाईघाईने ठराव करुन घेतला आहे. राज्य सरकारने नवी मुंबई विमानतळाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा केलेला ठराव रद्द केला. मग प्रशांत ठाकूर महापालिकेने केलेला ठराव दिबांसाठी का रद्द करू शकत नाही, असा जळजळीत प्रश्न कडू यांनी उपस्थित करुन मास्टरस्ट्रोक दिला आहे.







