बीसीसीआयला भीती; फ्रँचायझीना पाठवलं 8 पानांची नियमावली
| मुंबई | प्रतिनिधी |
इंडियन प्रीमियर लीग 2026 चा हंगाम सुरू असताना आता बीसीसीआयने खेळाडू आणि फ्रँचायझींशी संबंधित नियमांबाबत कडक भूमिका घेतली आहे. आयपीएलदरम्यान खेळाडूंना संभाव्य हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगसारख्या प्रकारांपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना 8 पानांची नियमावली पाठवत खेळाडूंच्या सुरक्षेबाबत विशेष सूचना दिल्या आहेत.
बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, मोठ्या स्पर्धांमध्ये काही वेळा खेळाडूंना जाणीवपूर्वक जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. अशा प्रकारांमुळे लैंगिक गैरवर्तनासारखे गंभीर आरोप किंवा कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक संघाने आणि व्यवस्थापनाने अधिक सतर्क राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बीसीसीआयने दिलेल्या नियमांनुसार आता खेळाडूंच्या हॉटेल रूममध्ये कोणत्याही बाहेरील व्यक्तीला थेट प्रवेश मिळणार नाही. कोणालाही भेटायचे असल्यास आधी टीम मॅनेजमेंटची परवानगी आवश्यक असेल. नातेवाईक किंवा मित्रांना फक्त हॉटेल लॉबी किंवा रिसेप्शन परिसरातच भेटण्याची मुभा दिली जाणार आहे.त्याचबरोबर खेळाडूंनी हॉटेलमधून बाहेर पडताना संघाच्या सुरक्षा अधिकाऱ्याला माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुरक्षा अधिकाऱ्याला न सांगता कोणताही खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफ बाहेर जाऊ शकणार नाही. बीसीसीआयच्या मते, यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. याशिवाय प्रत्येक खेळाडू आणि स्टाफ सदस्याने सुरक्षा तपासणीवेळी आपले ओळखपत्र दाखवणे आवश्यक असल्याचेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. काही सदस्य सुरक्षा कर्मचाऱ्यांशी सहकार्य करत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर हे नियम आणखी कडक करण्यात आले आहेत.
काही आयपीएल फ्रँचायझी मालकांनी सामना सुरू असताना डगआउटमध्ये खेळाडूंशी चर्चा करणे टाळावे. हे नियम पीएमओए प्रोटोकॉल आणि सुरक्षेशी संबंधित आहेत. या नियमांनुसार सामना अधिकारी आणि पंच यांच्याशी कोणत्याही बाहेरील व्यक्तीने संपर्क साधू नये. यामध्ये मालकांनाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. काही संघमालक सामना सुरू असताना खेळाडूंशी बोलताना दिसत असल्याने बीसीसीआयने त्यांना असे करू नये असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्याचबरोबर सामना जिंकल्यानंतर खेळाडूंना मिठी मारणे किंवा मैदानात जाऊन संपर्क साधणे टाळावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत. बीसीसीआयच्या मते, हे सामन्याच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन मानले जाऊ शकते. त्याचबरोबर बीसीसीआयने वेपिंग आणि प्रतिबंधित पदार्थांबाबतही कठोर नियमावली जारी केली आहे. काही ठिकाणी ड्रेसिंग रूममध्ये वेपिंग केल्याच्या घटना समोर आल्याने बीसीसीआयने याची गंभीर दखल घेतली आहे.







