वादळी वाऱ्यामुळे मोठी वित्तहानी; तरूणाचा वीज पडून मृत्यू
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि.9) दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही क्षणांतच या मुसळधार पावसाने झोडपून काढले. यावेळी पावसासोबत वादळी वाऱ्याचा जोर वाढल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. वादळी वाऱ्यामुळे महामार्गावर प्रचंड धुळ उडाल्याने वाहन चालकांना देखील तारेवरची कसरत करावी लागली. या पावसामुळे जिल्ह्यातील विविध भागांत झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर अनेक दुकानांचे फलक उडून गेले. तसेच, शहरातील मुख्य रस्त्यांवर पावसामुळे पाणी देखील साचले होते. त्यामुळे शहरी भागांसह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच, जिल्ह्यातील शेकतकऱ्यांमध्ये देखील चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्याचबरोबर एका तरूणाचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना देखील घडली आहे.
पनवेल तालुक्यात शनिवारी दुपारनंतर अचानक वातावरणात मोठा बदल झाला. जोरदार वादळी वाऱ्याने संपूर्ण परिसर हादरून गेला, तर त्यानंतर ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अचानक बदललेल्या हवामानामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास पनवेल शहरासह खारघर, कामोठे, कळंबोली, नेरे, वावंजे, पळस्पे आणि इतर ग्रामीण भागात जोरदार वादळी वारे वाहू लागले. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की सर्वत्र धुळीचे लोट उठले होते. अनेक भागांमध्ये काही वेळ दृश्यमानताही कमी झाली होती. अनेक घरांमध्ये धुळ शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली. या वादळी वाऱ्यामुळे वाहनचालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे दुचाकीस्वारांनी वाहने रस्त्याच्या कडेला थांबवून आश्रय घेतला. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याच्या घटना घडल्या. तसेच, अनेक ठिकाणी जाहिरातींचे फलक, बॅनर कोसळल्याचेही पाहायला मिळाले.
सुधागड तालुक्यात दुपारी अचानक पावसाला सुरुवात झाली. काही क्षणांतच मुसळधार पावसाने संपूर्ण परिसर झोडपून काढला. अचानक आलेल्या या पावसामुळे पालीसह तालुक्यातील विविध भागांत झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर अनेक दुकानांचे फलक उडून गेले. पाली बस स्टँड ते तहसील कार्यालय या मुख्य रस्त्यावर एक मोठे झाड उन्मळून पडले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पाली-खोपोली राज्य महामार्गावर चिवे गावाजवळ विजेचा मोठा खांब वाकल्यामुळे विजेच्या तारा रस्त्यावर खाली लोंबकळत होत्या. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक संथ झाली होती. याच मार्गावर खुरावले फाट्याजवळ मोठे होर्डिंग देखील पडले होते. त्याचबरोबर शहरातील मुख्य रस्त्यांवर पावसामुळे पाणी साचले आणि नागरिकांना तातडीने आसरा शोधावा लागला. तसेच, येथील एका पोल्ट्री फार्ममधील हजारो कोंबड्या मरण पावल्याची माहिती समोर आली आहे.
रोहे शहर व ग्रामीण भागात देखील सोसाट्याच्या वाऱ्याने अक्षरशः थैमान घातले होते. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले. तुफानी वादळवाऱ्यामुळे अनेक घरांवरील कौले व पत्रे उडवून गेल्याने अनेकांची मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. त्याचप्रमाणे रोहा रेल्वे स्टेशनच्या आवारातील बसण्याचे बाकडे जमीनदोस्त झाले. तर, कोलाड रेल्वे स्टेशन कार्यालयावरील पत्रे उडून नुकसान झाले आहे. तसेच, वीज पुरवठा खंडीत झाला असून, वादळी वाऱ्याचा वाहतुकीलाही फटका बसला. तसेच, शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, वीटभट्टी व्यवसायिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
तळा तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे जवळजवळ 80 टक्के नागरिकांचे नुकसान झाले आहे. काहींच्या घराचे छप्पर उडाले, तर काहींच्या घरावर भलेमोठे झाड कोसळले आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये कौलारू व पत्र्यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. लग्नसराई असल्याने बाजारपेठेत नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होती. मात्र, अचानक आलेल्या वादळामुळे तळा बाजारपेठेत धुळधान उडवली. त्यामध्ये व्यापाऱ्यांच्या साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याचबरोबर तालुक्यातील फळशेत येथील 14 वर्षीय वेदांत साळुंखे याचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अलिबागसह महाड, खालापूर, म्हसळा व मुरूड तालुक्यात देखील सायंकाळी जोरदार वाऱ्यासह अचानक वेगाने वारे वाहत धुळीचे मोठे लोट उठले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही भागांत झाडांच्या फांद्या रस्यावर पडल्यामुळे वाहतुक देखील संथ झाली होती.
दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून कोसळलेली झाडे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. हवामान खात्याने काही भागांत पावसाची शक्यता वर्तवली आहे.
बागायतदारांचे अतोनात नुकसान
मागील काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने संध्याकाळी हवामान आल्हाददायक झाले होते. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात असून, फळबागा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या आंब्याचा हंगाम ऐन भरात असताना या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची आंबे गळून पडले असून बागायतदारांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.






