कृषी विभागाच्या हंगाम आढावा बैठकीत निर्णय
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे भात बियाणांसह नागली (नाचणी) पिकांच्या उत्पादनावर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये यावर्षी 73 हजार 365 हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याबाबत अलिबागमधील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शुक्रवारी (दि.8) कृषी विभागाच्या खरीप हंगाम आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये 91 हजार 521 हेक्टर इतके भात लागवडीचे क्षेत्र आहे. गतवर्षी 70 हजार 446 हेक्टर इतक्या क्षेत्रात लागवड केली होती. यंदा या क्षेत्रात 3 हजारने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी 73 हजार हेक्टरवर भात लागवड करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. तसेच, रायगड जिल्ह्यात 2 हजार 811 हेक्टर इतके नाचणीचे क्षेत्र आहे. गेल्यावर्षी 2 हजार 491 हेक्टर क्षेत्रावर नाचणीची लागवड केली होती. यावर्षी 2 हजार 550 हेक्टर क्षेत्राचे लक्षांक आहे. या वर्षी शेतकऱ्यांना तातडीने बियाणे मिळावे, यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. खरीप हंगामासाठी 16 हजार 950 क्वींटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. त्यात 16 हजार क्विंटल सुधारीत, तर 60 क्विंटल संकरीत भात बियाणांचा समावेश असणार आहे. तसेच, महाबीजसह इतर खासगी कंपन्यांकडून बियाणे उपलब्ध केली जाणार आहेत. जिल्ह्यात यंदा 14 हजार टन खतांची मागणी कृषी विभागाने केली आहे. त्यात 11 हजार टन युरिया, 700 टन डिएपी, 1 हजार 500 मेट्रीक टन मिश्र खतांचा समावेश असणार आहे. जिल्ह्यात खतांसह बियाणांचा पुरवठा योग्य पद्धतीने व्हावा, यासाठी कृषी विभागाने नियंत्रण पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.







