ठेकेदारावर कोणतीही कारवाई नाही
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान डोंगरात असलेल्या गार्बेटवाडी येथील रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराने वन जमीनीत अनधिकृतपणे खड्डे खोदले आहेत. वन विभाग याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करीत नसल्याने संबंधित रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराविषयी घेत असलेली भूमिका संशयास्पद वाटत आहे. वन जमिनीमध्ये खोदलेले खड्डे याबाबत माथेरान आणि कर्जत वन विभाग यांच्याकडून टोलवाटोलवी करीत असल्याने वन विभागाचे नक्की चाललय तरी काय? असा प्रश्न आदिवासी भागातील लोक करीत आहेत.
माथेरान डोंगरात असलेल्या गार्बेटवाडी या ठिकाणी असलेल्या आदिवासी धनगर लोकांसाठीचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला होता. ही आदिवासी वाडी खालापूर तालुक्यात आहे. परंतु, या वाडीमध्ये जाण्यासाठी असलेला रस्ता कर्जत तालुक्यातून जात आहे. मात्र, हा रस्ता वन जमिनीतून जात असल्याने वन विभागाची परवानगी घेण्यात आल्यानंतर गतवर्षी रस्त्याचे काम सुरू झाले. त्यानंतर यावर्षी त्या भागातील अपूर्ण असलेल्या रस्त्याचे काम केले जात आहे. गतवर्षी रस्त्यासाठी तोडण्यात आलेल्या झाडांमुळे सर्वत्र गोंगाट झाला होता. त्यानंतर वन विभागाने ठेकेदारावर कोणतीही कारवाई केली नव्हती. आता त्याच रस्त्याच्या ठेकेदाराने रस्त्याचे काम करण्यासाठी गार्बेटवाडी येथील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे खोदले आहे. माथेरानमधील जंगल हे संरक्षित आणि इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून नोंदणीकृत आहे. त्या जंगलात खोदकाम आणि ब्लास्टिंग करण्यास बंदी आहे. असे असतानाही जंगलात खोदकाम करण्यात आले असून, त्या खड्ड्यांत पाणी साठवून ठेवले आहे. दरम्यान, या बाबात माथेरान, कर्जत व खालापूर वन विभागाकडे विचारले असता, हे क्षेत्र आमच्या अखत्यारित येत नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, वन जमिनीमध्ये खोदण्यात आलेले खड्डे कर्जत पश्चिम क्षेत्रात आहेत. परंतु, संरक्षित वन क्षेत्रातील जमिनीमध्ये खड्डे खोदण्यात आलेले आहेत. त्याबाबत कर्जत पश्चिम वन विभाग यांनी कोणत्याही प्रकारचे गुन्हे काम अद्याप केले नाही. त्यामुळे वन विभागाच्या या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाला आहे.







