| नाशिक | प्रतिनिधी |
टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला नाशिकरोड न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर रविवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
या संवेदनशील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निदा खान गरोदर असल्याने पोलिसांकडून वाढीव पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली नाही. त्यामुळे न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, तपासादरम्यान पीडितेला धार्मिक विषयांशी संबंधित 171 लिंक पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच धार्मिक विधी आणि विशिष्ट पोशाख स्वीकारण्यास भाग पाडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याच प्रकरणातील इतर आरोपींनी जामिनासाठी अर्ज दाखल केले असून, त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे.





