नोटीसला कायदेशीर उत्तर देण्याच्या तयारीत
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईबाबत शेकापच्या पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या प्रमुख साम्या कोरडे यांनी निषेध व्यक्त केला आहे. पोलिसांच्या नोटीसला कायदेशीर उत्तर दिले जाणार असल्याचा इशारा देत काही ही झाले तरी आंदोलन सुरुच ठेवणार, अशी ठाम भूमिका साम्या कोरडे यांनी घेतली आहे.
मुंबईमधील आयआयटीचा विद्यार्थी साहिल वाकोडे याला मृत्यू पश्चात न्याय मिळावा. यासाठी मुंबईत मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. नीटप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी लढा पुकारला. मुंबईत झालेल्या आंदोलनात शेकापच्या पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या प्रमुख साम्या कोरडे यांनी नेतृत्व केले. न्याय हक्कासाठी त्या लढल्या. मात्र, सरकारने पोलीस बळाचा वापर करीत त्यांच्यावर कारवाई सुरु केली आहे. मुंबई माटुंगा येथील परिमंडळ दोनचे उपआयुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी अनुराग जैन यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली साम्या कोरडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दखलपात्र गुन्हा व गैरकृत्य होण्याचा ठपका ठेवत त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 123 अन्वये खटला का चालवू नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. शुक्रवारी 30 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हजर राहण्यास सांगितले आहे. पोलिसांच्या या प्रकारामुळे पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या साम्या कोरडे यांनी निषेध व्यक्त केला आहे. घटनेने आंदोलनाचे हक्क दिले आहेत. अन्यायाविरोधात लढण्यासाठी आंदोलन करणे गरजेचे आहे. त्यामुळे जो लढा दिला आहे. कायदेशीर मार्गाने होता. चुकीचे काहीच केले नाही. संविधानाने आंदोलनाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे. पोलिसांनी दिलेल्या नोटीसला कायदेशीर उत्तर दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.






