ई -टेम्पोला परवानगी देण्याच्या हालचाली सुरू
| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये वाहनांना बंदी आहे, त्यामुळे मालवाहतूक ही घोड्यावरून करावी लागते. त्यामुळे माथेरान नगरपरिषद कडून ई- टेम्पो मिळावा अशी मागणी केली जात असताना राष्ट्रीय हरित लवाद यांच्याकडून हस्तक्षेप केला गेला आहे. लवकरच माथेरान मध्ये मालवाहतूक ने आण करण्यासाठी ई-रिक्षा वापरली जाऊ शकते असे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, माथेरानमध्ये वाहने नसल्याने सर्वाधिक खर्च हा मालवाहतुकीवर सुरू आहे. त्यामुळे मालवाहतूक करण्यासाठी ई-टेम्पो उपलब्ध झाल्यास कदाचित मालवाहतूक स्वस्त होऊ शकते.
माथेरानचे पर्यावरण जपण्यासाठी आणि प्रक्षण कमी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे आणि केतन रामाणे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली होती. प्रवासी घोड्यांची संख्या कमी करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. घोड्यांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा शास्त्रोक्त अभ्यास करण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाकडे सोपविण्यात आली होती. या अभ्यासाच्या अहवालानुसार घोड्यांच्या विष्ठेमुळे माथेरानमधील हवा, माती आणि पाणी प्रदूषित होत असल्याचे मत मांडले आहे. या पार्श्वभूमीवर हरित लवादाने माथेरान नगरपरिषद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय पर्यावरण विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती गठित केली होती.
माथेरानमधील पर्यावरणाचे संरक्षण आणि मालवाहू घोड्यांच्या जागी पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने पेटा या प्राणीमित्र संस्थेने पुढाकार घेतला आहे. माथेरान नगरपरिषदेला आठ ई-टेम्पो देण्याची तयारी संस्थेने दर्शवली आहे. यासंदर्भातील पत्र 26 ऑक्टोबर रोजी नगरपरिषदेकडे अहवाल सादर करण्यात आले. मालवाहतुकीसाठी ई-टेम्पोचा वापर सुरू झाल्यास घोड्यांची संख्या कमी करण्यास आणि त्यांच्या विष्ठेमुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
9 जून 2026 रोजी झालेल्या सुनावणीत हरित लवादाने घोड्यांच्या विष्ठेवर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया कशी केली जाणार, घोड्यांची संख्या टप्प्याटप्प्याने कशी कमी केली जाणार, घोड्यांचे तबेले कुठे स्थलांतरित केले जाणार आणि त्यांच्या वाहतुकीचे मार्ग कसे निश्चित केले जाणार, याबाबत माहिती सादर करण्यास माथेरान गिरीस्थान नगरपरिषद यांना सांगितले होते.
घोड्यांच्या संख्येत होणार घट
या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर 25 जून रोजी झालेल्या नगरपरिषदेच्या विशेष बैठकीत मालवाहू घोड्यांच्या जागी ई-टेम्पो वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. या पर्यायी व्यवस्थेमुळे घोड्यांची विष्ठा सुमारे 30 टक्क्यांनी कमी होऊ शकेल आणि त्यातून प्रदूषण कमी करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र,या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय हरित लवादाची परवानगी महत्त्वाची ठरणार आहे.
पेटाकडून आठ ई-टेम्पो देण्याची तयारी
माथेरानमधील मालवाहतुकीसाठी घोड्यांचा वापर दीर्घकाळापासून केला जातो. त्यावेळी पर्यावरणाचे संरक्षण आणि प्राण्यांचे कल्याण या दोन्ही बाबींचा विचार करून पर्यायी वाहतूक व्यवस्था उभी करण्याची गरज अधोरेखित होत आहे. पेटाकडून आठ ई-टेम्पो देण्याची तयारी प्राण्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या पेटा संस्थेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी अनेकदा माथेरानला भेट देऊन परिस्थितीचा अभ्यास केला आहे. संस्थेचे अधिकारी उज्ज्वल अग्रेन आणि महेश त्यागी यांनी या विषयात लक्ष घातले आहे. संस्थेने यापूर्वी दिल्ली आणि परिसरातील 208 मालवाहू घोडे व बैलांच्या चालकांना ई-टेम्पो उपलब्ध करून दिल्याची माहिती देण्यात आली आहे. माथेरानमध्येही ई-टेम्पोला हरित लवादाची मान्यता मिळाल्यास मालवाहू घोड्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी पेटा स्वतः घेईल, असे संस्थेचे ज्येष्ठ अधिकारी उज्ज्वल अग्रेन यांनी सांगितले आहे. ई-टेम्पोच्या प्रस्तावाला हरित लवादाची मान्यता मिळते का? आणि माथेरानमध्ये पर्यायी मालवाहतूक व्यवस्था प्रत्यक्षात कधी सुरू होते? याकडे स्थानिक नागरिक यांचे लक्ष लागले आहे.
सुनावणीकडे लक्ष..
29 ऑक्टोबरच्या सुनावणीकडे लक्ष माथेरान नगरपरिषदेने ई-टेम्पो वापरण्यास परवानगी मिळावी, यासाठी हरित लवादाकडे मागणी केली आहे. 29 ऑक्टोबर रोजी होणारी सुनावणी माथेरानच्या पर्यावरणीय भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
हरित लवादाने 9 जून 2026 रोजी घोड्यांची संख्या टप्प्याटप्प्याने कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. मालवाह घोड्यांचे ई-टेम्पोद्वारे पुनर्वसन करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. पेटाने आठ ई-टेम्पो देण्याची तयारी दर्शवल्याने पालिकेला मदत होणार आहे.
सुनील शिंदे







