महाराष्ट्रासह 16 राज्यांचा समावेश
| नवी दिल्ली | प्रतिनिधी |
निवडणूक आयोगाने मतदार यादी विशेष पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेचा तिसरा टप्पा देशभरात राबविण्याची घोषणा केली आहे. या टप्प्यात महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश यांसह 16 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश करण्यात आला आहे. मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, या टप्प्यात सुमारे 3.94 लाख बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) घरोघरी जाऊन 36.73 कोटी मतदारांची पडताळणी करणार आहेत. तसेच विविध राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले 3.42 लाख बूथ लेव्हल एजंट (बीएलए) देखील या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओ नियुक्त करून प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सहभागी स्वरूपात पार पाडण्याचे आवाहन आयोगाने राजकीय पक्षांना केले आहे.
जनगणनेंतर्गत सुरू असलेल्या घर सूची प्रक्रियेशी समन्वय साधण्यासाठी एसआयआरच्या तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून विविध राज्यांमध्ये मसुदा मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असून, सप्टेंबर ते डिसेंबर 2026 दरम्यान अंतिम याद्या जाहीर करण्यात येतील.
1 जुलै 2026 पासून ओडिशा, मिझोराम, सिक्कीम आणि मणिपूरमध्ये प्रक्रिया सुरू होणार असून अंतिम मतदार यादी 6 सप्टेंबरला प्रसिद्ध होईल. तसेच आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा आणि चंदीगडमध्ये प्रक्रिया सुरू होऊन अंतिम यादी 22 सप्टेंबर 2026 रोजी जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र, कर्नाटक, झारखंड, मेघालय आणि दिल्लीमध्ये 1 ऑक्टोबर 2026 पासून प्रक्रिया सुरू होईल. या राज्यांची अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाख वगळता देशभरातील मतदार यादी पुनर्विलोकन प्रक्रिया पूर्ण होणार आहे. डोंगराळ आणि बर्फाच्छादित भागांतील हवामान परिस्थिती तसेच जनगणनेचा दुसरा टप्पा लक्षात घेऊन या तीन प्रदेशांचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.







