आठ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील टोंक कला परिसरातील फटाका कारखान्यात गुरुवारी (दि.14) सकाळी भीषण स्फोट झाला. यात किमान आठ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ही दुर्घटना सकाळी सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. स्फोटावेळी कारखान्यात सुमारे 200 महिला कामगार उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. स्फोट इतका जोरदार होता की, परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, बचाव पथके आणि प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.






