| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील मानी येथील एका खोलीमध्ये 18 वर्षीय परप्रांतीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. त्याचा मृतदेह सायंकाळी अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, रबी सरकार असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण मूळचा कोलकाता येथील रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून तो मानी परिसरातील एका चायनीजच्या दुकानात कामासाठी आला होता. मालकाने दिलेल्या एका खोलीमध्ये तो राहात होता. शुक्रवारी दुपारी जेवण झाल्याव तो त्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेला होता. सायंकाळी साडेतीननंतर तो कामावर पुन्हा आला नाही. त्यामुळे मालक त्याला खोलीमध्ये बघायला गेले. त्यावेळी दरवाजा बाहेरून उघडला गेला नाही. अखेर दरवाजा उघडल्यावर तो लटकलेला दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी धाव घेतली. प्राथमिक तपासणी करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह अलिबामधील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मृत तरुणाच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, तो सतत मोबाईलवर कोणाशी तरी संवाद साधत असल्याची माहिती चर्चेतून उपलब्ध झाली आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.




