| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. भारतातील खेळाडूंच्या उत्तेजक सेवनाच्या वाढत्या प्रमाणावर लक्ष देता आता ‘डोपिंग’ हा या देशामध्ये गुन्हा ठरणार आहे. तसेच खेळाडूंना बंदी घातलेली औषधे पुरवणाऱ्या व्यक्तींना आता पाच वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
खेळाडूंना डोपिंगसाठी बंदी घातलेली औषधे देणे, पुरवणे, विकणे किंवा त्यासाठी मदत करणे हा गुन्हा मानला जाईल. दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास, दोन लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. यामध्ये जाणूनबुजून बंदी असलेली औषधे लिहून देणाऱ्या डॉक्टरांनाही कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
भारतातील डोपिंगविरोधी कायद्यात पुन्हा बदल करण्याची तयारी सुरू आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने या प्रस्तावित दुरुस्त्या आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या आहेत. नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या असून, त्यासाठी 18 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रशिक्षक, व्यवस्थापक, सहकारी खेळाडू किंवा खेळाडूंशी थेट संपर्कात असलेली कोणतीही व्यक्ती जर बंदी असलेल्या औषधांच्या पुरवठ्यात सहभागी असल्याचे आढळले, तर तिच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. ऑलिंपिक यजमानपदाची भारत सलग तीन वर्षे जागतिक डोपिंग यादीत अव्वल राहिला आहे. यामुळे 2036 ऑलिपिंक यजमानपदाच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेला याचा फटका बसू शकतो.
लोकांच्या अभिप्रायानंतर हे विधेयक संसदेतल्या आगामी पावसाळी अधिवेशनात मांडले जाईल. ‘डोपिंग’ आता फक्त खेळातील नियमभंग राहिलेला नाही. त्यामागे संघटित रॅकेट तयार झाले आहे. आतापर्यंत फक्त औषधे घेणाऱ्या खेळाडूंवर कारवाई होत होती, पण आता पुरवठा करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
मनसुख मांडविय
क्रीडामंत्री






