| महाड | प्रतिनिधी |
महाड शहरातील पथदिवे दुरुस्तीचे काम करत असताना हुंडेकरी इंटरप्राईजेस कंपनीचा कामगार राजू बाईत गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. विजेचा अचानक प्रवाह सुरू झाल्याने ते पोलवरून खाली कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.
महाड नगरपालिकेकडून शहरातील पथदिवे व विद्युत देखभाल दुरुस्तीचे काम हुंडेकरी इंटरप्राईजेस या कंपनीला देण्यात आले आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास राजू बाईत हे महाड शहरात विद्युत स्ट्रीट लाईट दुरुस्तीचे काम करत होते. यावेळी अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी मुंबईला रवाना करण्यात आले. दरम्यान, संबंधित कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजनांकडे संबंधित ठेकेदार आणि विद्युत विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
पथदिवे दुरुस्तीचे काम कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने देण्यात आले आहे. कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. महाड नगरपालिकेकडून अटी व शर्तींसह त्यांना परवानगी देण्यात आली असून, अपघात झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी ठेकेदाराची राहील, असे लेखी स्वरूपात घेण्यात आले आहे.
रंजीत भोसले,
अभियंता, महाड नगरपालिका







