| खांदा कॉलनी | वार्ताहर |
पनवेल- उरण नाका येथील पुलावर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. सकाळी कार्यालयीन वेळेत तसेच सायंकाळी घरी परतताना या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. काही वेळा अवघ्या काही अंतरासाठी वाहनचालकांना बराच वेळ वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने करंजाडे ते पनवेलदरम्यान गाढी नदीवर नवीन पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. या पुलामुळे करंजाडे परिसरातून पनवेल शहरात येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या उरण नाका येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होत असल्याने या ठिकाणी वाहतुकीचा ताण वाढत आहे. त्यातच करंजाडे परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता पर्यायी मार्गाची गरज अनेक दिवसांपासून व्यक्त केली जात होती.
नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील वाहतुकीचे नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने करता येणार आहे. उरण नाका येथील पुलावरील वाहनांचा भार कमी होण्यास मदत होईल. विशेषतः दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच करंजाडे आणि पनवेल शहरादरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होऊ शकतो. महानगरपालिकेने हाती घेतलेल्या या कामामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मात्र, पुलाचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण होणे आणि कामाचा दर्जा राखणे आवश्यक आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पुलाचे लोकार्पण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.






