नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरून गोवे गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील पुई येथील महिसदरा नदीच्या पुलाजवळ मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पुई ग्रामपंचायत हद्दीतील हा कचरा बेशिस्तपणे टाकण्यात येत असल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
गोवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे. या परिसरात स्थानिक ग्रामस्थांसह कॉलेज विद्यार्थी आणि भाडेकरूंची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने हा कचरा महिसदरा नदीच्या पुलाजवळ, भोई समाज मंदिराच्या बाजूला टाकला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या मार्गावरून दररोज शाळा व कॉलेजचे विद्यार्थी, कामगार तसेच कोलाड बाजारपेठेत ये-जा करणारे असंख्य नागरिक प्रवास करीत असतात. मात्र परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळे आणि असह्य दुर्गंधीमुळे नागरिकांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
पावसाळा तोंडावर आला असून काही दिवसांत महिसदरा नदी दुथडी भरून वाहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पुलाजवळ टाकण्यात आलेला कचरा नदीपात्रात वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महिसदरा नदीचे पाणी गोवे, मुठवली आणि बाहे येथील ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असल्याने पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दूषित पाण्यामुळे विषमज्वर (टायफॉईड), गॅस्ट्रो, कावीळ, डेंग्यू, मलेरिया, श्वसनविकार, त्वचारोग, पटकी आणि हिवताप यांसारख्या गंभीर आजारांचा फैलाव होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या गंभीर समस्येकडे पुई ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष देऊन कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गोवे ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.







