| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहर वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भा. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेंद्रसिंग राजपूत हे क्रेन व्हॅनद्वारे गस्त घालत होते. यावेळी पनवेल रेल्वे स्टेशनच्या पूर्व बाजूस नीलकमल हॉटेलसमोर नो पार्किंगमध्ये उभी असलेली एमएच 48 सीएल 9161 क्रमांकाची मोटारसायकल टोविंग करून आणण्यात आली.
यानंतर वाहन मालकाशी मोबाईलद्वारे संपर्क साधला असता संबंधित मोटारसायकल नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वाहन मालकाला माहिती देऊन वाहन रीतसर ताब्यात घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या. पनवेल शहर वाहतूक शाखेच्या दक्षतेमुळे चोरीची दुचाकी शोधण्यात यश आले असून, पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.





