| मुंबई | प्रतिनिधी |
राज्याचं मुख्य सत्ता केंद्र असलेल्या मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून तब्बल 80 हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या मंत्रालयात थेट मंत्र्यांच्याच दालनात चोरी झाल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या चोरीच्या घटनेनंतर आता मंत्रालयातील नियमांवरून एक नवीनच राजकीय आणि प्रशासकीय चर्चा रंगू लागली आहे. नियमांनुसार, मंत्रालयात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा कर्मचाऱ्याला आपल्यासोबत दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम आत घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. मुख्य प्रवेशद्वारावरच तपासणीदरम्यान तशा सूचना दिल्या जातात. असे असताना मंत्री संजय राठोड यांच्या शासकीय कार्यालयात तब्बल 80 हजार रुपयांची एवढी मोठी रोकड आली कुठून? आणि ती तिथे का ठेवण्यात आली होती? याबाबत आता उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. ही रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात येताच कार्यालयात एकच धावपळ उडाली. रात्री उशिरापर्यंत कसून झाडाझडती घेण्यात आली.







