| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्याला क्रांतीचा इतिहास असून, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वास्तव्य आणि दोन क्रांतिकारक यांचे बलिदान या तालुक्यात झाले आहे. या तालुक्याचे पंचायत समितीचे कार्यालय असलेल्या ठिकाणी गटविकास अधिकारी आणि सभापती तसेच उपसभापती यांचे दालने सुशोभित करण्यात आले आहे. तर, छत्रपती शिवाजी महाराज आणि दोन्ही क्रांतिकारकांच्या मूर्ती असलेली दालने अडगळीत असून, त्यांच्या डोक्यावरील छप्पर फाटले आहे. दरम्यान,या प्रकरणात पोलीस मित्र संघटनेने उडी घेतली असून, जुलै महिन्यापर्यंत महापुरुषांचे दालन सुशोभित झाले नाहीतर उपोषणासोबतच कार्यकर्ते मिळून ते दालन सुशोभित करू, असा इशारा दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी कर्जत पंचायत समितीचे जुन्या इमारतीत त्यांच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. कर्जत पंचायत समितीचे प्रत्येक सभेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार घालूनच होत होती. नवीन इमारतीत कार्यालय हलवण्यात आले आणि त्यानंतर तब्बल 2 वर्षांनी छत्रपती आणि हुतात्मा यांची मूर्ती एका दालनात उभारण्यात आल्या. मात्र, त्यावेळी बनवलेल्या दालनाला कोणत्याही प्रकारचे सुशोभीकरण करण्यात आले नाही.3 वर्षांनी कर्जत पंचायत समितीमध्ये सदस्य मंडळ अस्तित्वात आले. जानेवारी महिन्यात निवडणुका झाल्या आणि सभापती व उप सभापती यांची दालने त्यांच्या नियुक्तीच्या आधीच सुशोभित झाली. मात्र ,त्या तिन्ही दालनाच्या समोर असलेली महापुरुषांचे दालनांचे फाटलेले छप्पर दुरुस्त करण्याचे सत्ताधाऱ्यांना जमले नाही. पोलीस मित्र संघटनेने गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांच्याकडे महापुरुषांचे दालनांचे दुरुस्ती करण्याची परवानगी मागितली. आम्ही पैसे देणगी मधून उभे करू आणि दालन सुशोभित करू असा विचार गटविकास अधिकारी यांच्यासमोर आक्रमकपणे मांडण्यात आला. शेवटी गटविकास अधिकारी पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीचे आचारसंहिता संपल्यानंतर तत्काळ निविदा काढली जाईल आणि 18 जुलै पूर्वी काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन दिले.







