मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कारवाई
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील विचुंबे ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणाला आता अधिकृत चौकशीचे स्वरूप प्राप्त झाले असून, या प्रकरणाची सखोल तपासणी करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. पुरुषोत्तम भोईर यांनी केलेल्या तक्रारीनंतर पंचायत समिती उरण कार्यालयाने याबाबत हालचाली सुरू केल्या असून, संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे.
रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार या प्रकरणासाठी चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रारीमध्ये ग्रामसेवक आणि सरपंच यांनी विविध विकासकामे व आर्थिक व्यवहारांमध्ये कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2 जून ग्रामपंचायत विचुंबे येथे प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीदरम्यान ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, ठराव पुस्तिका, विकासकामांचे अभिलेख, खर्च नोंदी तसेच इतर आवश्यक दस्तऐवज सादर करण्याचे निर्देश ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
या प्रकरणामुळे विचुंबे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून, चौकशीत नेमके काय निष्पन्न होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. अनेक ग्रामस्थांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर काहींनी विकासकामांच्या निधीचा योग्य वापर झाला का, याचीही सखोल तपासणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
दरम्यान, पंचायत समिती उरणचे गटविकास अधिकारी संजराव पाटील यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या पत्राची प्रत संबंधित ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद प्रशासनालाही पाठविण्यात आली आहे. त्यामुळे आता या चौकशीतून कोणते तथ्य समोर येते आणि प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







