पनवेलमध्ये 111 मॉडिफाइड सायलेन्सर नष्ट; कर्णकर्कश आवाजाविरोधात जनजागृती
| पनवेल | प्रतिनिधी |
दुचाकींमध्ये अनधिकृतरीत्या बसविण्यात येणाऱ्या मॉडिफाइड सायलेन्सरमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी पनवेल शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान जप्त करण्यात आलेले 111 मॉडिफाइड सायलेन्सर तोडून नष्ट करण्यात आले. ध्वनीप्रदूषणाचे प्रतीक म्हणून रावणाची प्रतिकृती तयार करून या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
मॉडिफाइड सायलेन्सरमुळे निर्माण होणाऱ्या कर्णकर्कश आवाजाचा ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी आणि रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. ही समस्या रोखण्यासाठी तसेच वाहनांमध्ये अनधिकृत बदल करणाऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. पोलीस उपायुक्त (वाहतूक) डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांच्या पुढाकाराने ही कारवाई करण्यात आली.
यावेळी सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) योगेश गावडे, पोलीस निरीक्षक महेश सरतापे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सविता भागवत, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम कदम, वाहतूक शाखेचे कर्मचारी, नगरसेवक राजू सोनी तसेच पनवेल विभागातील पत्रकार उपस्थित होते. वाहनांमध्ये अनधिकृत मॉडिफाइड सायलेन्सर बसवू नयेत, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या उपकरणांचा वापर टाळावा आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले. ‘ध्वनीप्रदूषणाला आळा घाला, शांत आणि सुरक्षित पनवेल घडवा!’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. ध्वनीप्रदूषणमुक्त शहरासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले.







