प्लास्टिकमुक्तीसाठी नगरपरिषदेचा अभिनव उपक्रम
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त अलिबाग घडविण्याच्या दिशेने अलिबाग नगरपरिषदेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्लास्टिक कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन आणि जनजागृती करण्याच्या उद्देशाने अलिबाग एसटी स्थानक परिसरात ‘बॉटल बीन’ बसविण्यात आली असून, तिचे लोकार्पण शुक्रवारी उत्साहात करण्यात आले.
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ) यांच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आलेल्या या बॉटल बीनचे उद्घाटन अलिबाग नगरपरिषदेचे वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, नगरसेविका अश्विनी ठोसर, नगरसेवक अनिल चोपडा, समीर ठाकूर, सागर भगत, ॲड. ऋषीकेश माळी, आनंद पाटील, जमाल सय्यद, अलिबाग एसटी आगाराचे व्यवस्थापक राकेश देवरे, आरसीएफचे जनसंपर्क अधिकारी राकेश कवळे, योगेंद्र भोईर, सुरेश चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अलिबाग एसटी स्थानक हे जिल्ह्यातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र असून, येथे दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असते. परिणामी, स्थानक परिसरात प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, शीतपेयांच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, कागदी व प्लास्टिक वेष्टनांचा कचरा मोठ्या प्रमाणात साचत असल्याचे चित्र दिसून येते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अलिबाग नगरपरिषदेने हा उपक्रम हाती घेतला आहे.
स्थानक परिसरात बसविण्यात आलेल्या बॉटल बीनमध्ये प्रवाशांनी वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या व अन्य पुनर्वापरयोग्य प्लास्टिक कचरा टाकावा, यासाठी जनजागृतीही करण्यात येणार आहे. या माध्यमातून स्थानक परिसर स्वच्छ राहण्यास मदत होणार असून, प्लास्टिक कचऱ्याचे योग्य संकलन आणि विल्हेवाट लावणेही शक्य होणार आहे. अलिबाग नगरपरिषदेच्या सहकार्याने आणि आरसीएफच्या सहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले. पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनीही पुढाकार घेऊन स्थानक परिसरातील प्लास्टिक कचरा बॉटल बीनमध्येच टाकावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.







